मुंबई : राज्यात एसटीचा संप सुरू आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असं पवार म्हणाले. तसेच कर्मचाऱ्यांना परब यांनी अनेकदा मुभा दिली. परंतु आता सहनशीलता संपत आली आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नये, असंही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असं आवाहन त्यांनी केलं.
दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेतनवाढीनंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, असे सांगत कर्मचाऱ्यांना कामावर परत या अशी साद घालत कठोर कारवाईचा अल्टिमेटम दिला आहे.
दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी सूचित केले आहे की, आज संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचाही निर्णय होवू शकतो. सरकारने पुन्हा – पुन्हा आवाहन केल्यानंतरही कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर कायम आहेत. वारंवार नोकरीवर हजर होण्याचं आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी आंदोलन करत असल्याने राज्य सरकार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील सोमवारपर्यंत कामगारांना पुन्हा रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यात काहीच बदल झालेला नसल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहनशीलता संपत चालल्याचं म्हटले आहे.
माझी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी कामावर रुजू व्हावं. कोरोनाच्या संकटानंतर आता शाळा सुरू झाल्यात. गरीबांसाठी एसटी म्हणजे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. असं असतानाही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेत, हे बरोबर नाही. शेवटी एसटी कर्मचारीही आपलेच आहेत, आणि प्रवासीही आपलेच आहेत. यामध्ये समजूतदार भूमिका घेणं गरजेचे आहे. माझी विनंती आहे की, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे.
बडतर्फी, निलंबन, नोटीसानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने सरकार कारवाईच्या तयारीत आहे.
* बडतर्फीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू; STच्या 230 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा
संपावर गेलेल्या आणि निलंबनानंतरही एसटी महामंडळाला प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 230 एसटी कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली असून सात दिवसांत उत्तर न दिल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे. मंगळवारी (ता. 14) 38 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे एसटीच्या एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 10,300 झाली आहे