सोलापूर : न्यायदंडाधिकारी पोलीस व अधीक्षकांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यावरुन पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना राजस्थान व उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.
मोनुकुमार नथुसिंग पाल ( वय २६, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) व देवकरण हनुमानसिंग रावत ( वय – २४, रा. अजमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मागील काही महिन्यांपासून फेसबुकवरील प्रोफाइलची कॉपी करून फेक प्रोफाइल बनवून सदरची व्यक्ती ही तीच आहे असे भासवून वेगवेगळ्या अडचणी असल्याची कारणे सांगून तत्काळ सांगून फोनपे, गुगलपेसारख्या ऑनलाइन ॲपव्दारे पैशाची वाढ झाली होती.
जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे फेसबुकचे बनावट अकाउंट तयार करून त्यांचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना पैशांची तत्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना फोनपे गुगलपेचे नंबर देवून त्यावर पैसे पाठविण्याबाबत सांगितले.
त्यातील दोन व्यक्तींनी अनुक्रमे १० हजार रुपये व सात हजार रुपये पाठवून दिले. त्यांची फसवणूक केल्याने माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेही बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैसे पाठविण्याबाबत सांगितल्याने अज्ञात इसमाविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या दोन्ही गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता. सदर दोन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास व विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून दोन तपास पथके उत्तरप्रदेश व राजस्थान या ठिकाणी रवाना करण्यात आली होती.
या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती काढून दोन्ही गुन्ह्यातील प्रत्येकी एक आरोपींना गुन्हा करण्याकरिता वापरलेले मोबाइल फोन तपासकामी जप्त करून जेरबंद करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शांताराम शेळके, फौजदार गणेश पिंगुवाले, शैलेश खेडकर, सूरज निंबाळकर आदींनी केली आहे.
* फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
– फेसबुक प्रोफाईलची माहिती व फोटो लॉक करा; अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारु नका
– फेसबुकवरील मित्र दिसणार नाहीत म्हणून ‘ओन्ली मी’ हा पर्याय निवडावा
– फेसबुकवरून कोणी पैसे मागत असल्यास समोरील व्यक्ती तीच आहे का, याची खात्री करा
– बनावट फेसबुक अकाउंट कोणी तयार केल्यास pretending to me हा पर्याय निवडून ते तत्काळ बंद करा
– कोणत्याही व्यक्तीला ऍप, फोन, एसएमएसद्वारे बॅंक खात्याची, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका
– कोणत्याही कंपनी, सर्व्हिसेसची माहिती कस्टमर केअर नंबर, गुगलवर शोधू नका