मी माढ्याचा खासदार आहे, त्यामुळे माढा नगरपंचायत निवडणुकीची एकहाती जबाबदारी माझ्याकडे द्या असे प्रदेश पातळीवर छातीठोकपणे सांगणाऱ्या खासदार निंबाळकरांचा ‘मी’ पणा त्यांनाच नडला आहे.
माढा नगरपंचायतीमध्ये भाजपला एकही उमेदवार मिळाला नसून पक्षाला साधे पुरस्कृत उमेदवारही उभा करता आले नाही. त्यामुळे माढामध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ही बाब सोलापूर जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार असणा-या भाजप पक्षासाठी लाजीरवाणी असल्याचे मानले जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असलेल्या माढा नगरपंचायतीत भाजपचे किंवा भाजप पुरस्कृत पॅनलच नसणे ही तोंड लपवण्याची वेळ भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे आली आहे. जिल्ह्यात लागलेल्या नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी यांच्या सोबत विचारविनिमय न करता निंबाळकर देशमुखांनी केलेल्या कारभारामुळेच भाजप कार्यकर्त्यांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
३ तारखेच्या पुण्यामध्ये झालेल्या आढावा बैठकीत श्रीकांत देशमुख यांनी माढा नगरपंचायतीची सर्व गणित खासदार निंबाळकर यांनी माढा शहरातील राजेंद्र चवरे, आनंदराव कानडे, शहाजी साठे यांना सोबत घेत गणित जुळवत आणले आहे, असे सांगत म्हणून चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते फडणवीस यांना सांगितले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र त्यांचे हे गणित साफ चुकीचे ठरले. कोणताही ताळमेळ न बसल्यामुळे आणि अनुभवाची कमतरता असल्यामुळे खासदार निंबाळकर व श्रीकांत देशमुख हे हे माढा नगरपंचायतीमध्ये भाजपचा एकही उमेदवार देऊ शकले नाही.
या लोकांना भाजप पुरस्कृत सुद्धा उमेदवार मिळाला नाही. भाजप मधील सावळ्या गोंधळाचे वातावरण पाहून चौरे साठे आणि कानडे यांनी प्रा. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झेंडा हाती धरला. इथेच खासदार निंबाळकर व श्रीकांत देशमुख यांच्या राजकीय मर्यादा स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराला माढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप पक्षाचे किंवा पुरस्कृत पॅनल उभा करता येत नसेल तर ही बाब पक्षासाठी लाजीरवाणी आहे की स्वतः साठी? , पक्षाने सुद्धा विचार करावा, सातारा जिल्ह्यातील एखादा पुढारी खासदार झाला तरी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातील खोलीचा अंदाज त्याला समजणार नाही, स्थानिक नेत्यांना जबाबदारी दिली असती तर पक्षावर देखील ही वेळ आली नसती.
जिल्हा अध्यक्ष म्हणून श्रीकांत देशमुख यांनी सुद्धा माढा नगरपंचायती बाबतीत चुकीचे ब्रिफिंग केले, या बद्दल सुद्धा पक्षाने खुलासा मागवावा, सोलापूर जिल्ह्यातील आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार व जिल्हा अध्यक्ष यांच्यावर विसंबून न राहता पक्षाने स्वतः आढावा घ्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.