ढाका : आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पाकिस्तानला पराभूत केले आहे. तसेच कांस्य पदक जिंकले आहे. भारताने या सामन्यात चार गोल केले. तर पाकिस्तानला तीन गोल करता आले. सुरुवातीपासून भारताने सामन्यात आक्रमक खेळ केला. दरम्यान भारताचा सेमीफायनलमध्ये जपानकडून पराभव झाला होता. त्यानंतर आज कांस्य पदकासाठी लढत झाली.
बांगलादेशमधील ढाका येथे पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली. सेमी फायनलमध्ये जपानकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी दमदार कमबॅक करत कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेतील सलामीच्या लढती दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना २ – २ असा बरोबरीत सुटला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रंगतदार होणार याची चाहत्यांना अपेक्षा होती. त्यानुसार शेवटच्या मिनिटापर्यंत खेळ रंगला आणि अखेर भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंवर वरचढ ठरला. जपानकडून ३-५ असा सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघासाठी आजचा सामना जिंकणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता. भारतीय हॉकीपटूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पाकिस्तानी संघाला पराभूत केल. विशेष म्हणजे, कर्णधार मनप्रीत सिंगने संघाचे उत्तम नेतृत्व केले आणि सामनावीराचा किताबही पटकावला.
भारतीय संघाने सुरूवातीपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व राखलं. पहिल्या पाच मिनिटांच्या खेळातच भारतीय संघाने पहिला गोल करत सामन्यात १-० ची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नरचा योग्य वापर केल्याने भारताला पहिला गोल मिळाला. काही काळ झुंजवल्यानंतर अखेर ११व्या मिनिटाला पाकिस्तानकडूनही अर्फराजने दमदार गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पूर्वार्धाच्या खेळात (Half Time) आणखी गोल झाले नाहीत.
A magnificent game of 🏑 comes to an end, with the #MenInBlue managing to beat Pakistan and taking the third position in the Hero Men’s Asian Champions Trophy Dhaka 2021. 💙#IndiaKaGame #HeroACT2021 pic.twitter.com/MJCAvYjNgy
— Hockey India (@TheHockeyIndia) December 22, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही दुसरी लढत होती. राउंड रॉबिनमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला ३ – १ अशी मात दिली होती.
उत्तरार्धाचा खेळ सुरू झाला त्यावेळी भारत आणि पाकिस्तान बरोबरीत होते. त्यामुळे सामना नक्की कोणत्या दिशेने झुकतो याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष होते. ३३ व्या मिनिटाला अब्दुल राणाने पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. पण ४५ व्या मिनिटाला सुमीत सिंगने भारताला पुन्हा बरोबरीत आणले. शेवटच्या १५ मिनिटात खेळ अधिकच रंगत गेला.
५३ व्या मिनिटाला वरूण कुमार तर ५७ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल करत भारताला आघाडीवर नेले. अवघ्या काही सेकंदातच पाकिस्तानच्या नदीमने एक गोल करत गोलमधील अंतर कमी केले. पण खेळ संपेपर्यंत भारताने पाकला गोल करू न दिल्याने अखेर भारत ४-३ ने विजयी झाला.
बांगलादेश, पाकिस्तान आणि जपान यांच्या विरुद्ध दमदार विजय नोंदवत भारतीय संघाने आशियाई स्पर्धेची सेमी फायनल गाठली. साखळी फेरीत जपानला भारतीय संघाने ६ – ० असे पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघ त्यांना नमवत फायनल गाठेल, असेच वाटत होते. पण दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे आशियाई चॅम्पियन होण्याची संधी हुकली. पण अखेर तिसऱ्या क्रमाकांसाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला नमवत टीम इंडियाने स्पर्धेचा शेवट गोड केला.