मोहोळ : दूध डेअरीच्या पैशाच्या व्यवहाराची चर्चा करण्यासाठी म्हणून आलेल्या नेचर दूध डेअरी च्या ८ ते १० व्यक्तींनी नरखेड येथील दोघांना उचलून नेऊन बेकायदेशीर कोंडून ठेवीत त्यांच्या खिशातील मोबाईल व खिशातील रोख ५० हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार काल बुधवारी ( दि.२२ डिसेंबर) घडला.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, योगेश नवनाथ राऊत (रा. नरखेड) हे गावातून इतर शेतकर्यांकडून गोळा केलेले दूध नेचर डिलाईट डेअरी कळस (ता. इंदापूर) येथे पाठवत होते. त्या मोबदल्यात त्यांना कमिशन देण्याचे ठरले होते. फेब्रुवारी ते जुलै २०२० पर्यंत त्यांना नेचर डिलाईट डेअरी कडून कमिशन देण्यात आले नव्हते. वारंवार मागणी करूनही त्यांचे कमिशन मिळत नसल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२० पासून दूध पाठवणे बंद केले.
राऊत यांच्याकडे नेचर डेअरी यांचे पतसंस्थेचे व त्याचे पशुखाद्य कंपनीचे ॲडव्हान्स होता. ते पैसे परत करण्याबाबत डेअरीकडून तगादा लावत होते. सदरच्या पैशाबाबत मयूर जमादार यांनी वेळोवेळी फोन करून पैसे भरण्यास सांगत होते. त्यावेळी राऊत यांनी अगोदर मला माझ्या दिलेल्या दुधाच्या कमिशनचे पैसे द्या, मगच तुमचा व्यवहार पूर्ण करू असे सांगितले. यानुसार एप्रिल २०२१ मध्ये राऊत हे नेचर डेअरी कळस (ता. इंदापूर) येथे गेले होते, त्यावेळी हिशोब झाला नव्हता.
दरम्यान २१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास योगेश राऊत हे शेतात असताना त्यांना नेचर डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल वरून फोन करून पैशाबद्दल चर्चा करण्यासाठी नरखेड गावाजवळ असलेल्या धर्मराज जाधव यांच्या शेतात बोलवून घेतले. त्या ठिकाणी अगोदरच आठ ते दहा अनोळखी लोक थांबलेले होते.
राऊत तिथे चर्चा करण्यासाठी गेले असता थांबलेल्या लोकांनी त्यांना उचलून बोलेरो जीपमध्ये टाकले व त्यांच्याकडे असलेला मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी त्या ठिकाणी गावात असलेल्या दोन व्यक्तींनी गाडीत टाकताना पाहिले, याबाबतची माहिती त्यांनी त्यांचा चुलतभाऊ दयानंद दत्तात्रय राऊत यांना फोनवरून दिली.
दयानंद राऊत यांनी त्यांच्या जीपला थांबवून विचारत नेचर डेअरी च्या कर्मचाऱ्यांनी दयानंद यालाही उचलून दुसऱ्या जीपमध्ये टाकले व दोघांना घेऊन नेचर डिलाईट डेअरी कळस (ता. इंदापूर) येथे एका खोलीत बंद करून ठेवले. त्यादरम्यान दयानंद याच्या खिशात असलेले ५० हजार रुपये काढून घेतले. त्याच दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिस गाडी शोध घेत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी योगेश व दयानंद या दोघांना सोडून दिले. ते दोघेही वालचंद नगर पोलीस ठाण्यात गेले व त्या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.
यानुसार २२ डिसेंबर रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी दुधाच्या कमिशनच्या व पैशाच्या व्यवहाराबाबत चर्चा करण्यासाठी म्हणून येऊन मयूर यादव, खरात, प्रताप कुंभार, वैभव गिरमे, संदीप जगताप, मनोज यादव अश्या आठ ते दहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.
बोलेरो जीप मध्ये उचलून नेऊन बेकायदेशीरपणे कोंडून ठेवत मोबाईल व खिशातील ५० हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी योगेश राऊत याने मोहोळ पोलिस ठाण्यात वरील संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
● अवैध सावकारकीच्या धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
बार्शी : येथील सहाय्यक निबंधक कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे अवैध सावकारकी प्रकरणी पोलिसांसह घालण्यात आलेल्या धाडीत आक्षेपार्ह आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या कागदपत्रांची छाननी सुरु असून चौकशी झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांनी दिली आहे.
शहरातील दत्तनगर भागातील रहिवाशी अनिल मुरलीधर खाडे यांनी अवैध सावकारकीप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुषंगाने सहकार विभागाने सहकार अधिकारी सचिन महाडिक, सतिश मोरे, उमेश मुसळे, सुहास राऊत या पथकाची नियुक्क्ती केली. या पथकाने पोलिस कर्मचार्यांना सेाबत घेवून उपळाई रस्त्यावरील रंजेश मुसळे व राकेश मुसळे यांच्या राहत्या घरी व श्री भगवंत मंदिराजवळील दुकानी सोमवारी रात्री धाड मारली.
या धाडीत 7 सही केलेले कोरे धनादेश, एक चार लाख रुपयांचा, एक 24 हजार रुपयांचा धनादेश, पाच कोरे मुद्रांक, 100 रुपयांच्या मुद्रांकावरील उसनवार पावती, एक कब्जे साठेखत, एक साठेखत, फेरखरेदीबाबतचे पत्र आदी अवैध सावकारकीस पूरक असणारी कागदपत्रे आढळून आली. ती जप्त करुन ताब्यात घेण्यात आली.