सांगली : सांगलीच्या देवराष्टे येथील रहिवासी दत्तात्रेय लोहार यांचा जुगाड मिनी जीपचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी त्या व्हिडिओची दखल घेतली. महिंद्रा यांनी दत्तात्रेय यांना जुगाड जीपच्या बदल्यात बोलेरो गाडी देण्याची ऑफर दिली. पण ती ऑफर त्यांनी नाकारली आहे. ती गाडी माझी ‘लक्ष्मी’ असं म्हणत त्याऐवजी अशीच दुसरी गाडी बनवून देतो असं लोहार म्हणाले.
एका युट्युब चॅनलवरच्या एका व्हिडिओमुळे या माणासाविषयी, त्याच्या कारच्या निर्मितीविषयी सर्वांना माहिती झाली आहे. आपली कार सुंदर दिसावी, इतर महागड्या कार्समध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याही कारमध्ये आपल्याला कशा आणता येतील, आपलीही कार आपल्या परीने कशी दिमाखदार, सुसज्ज करता येईल यासाठी या माणसाने चांगलीच शक्कल लढवली.
कारसाठी पॅशन बाईकचं इंजिन वापरलं, जुन्या गंजलेल्या जीपच्या बोनेटला वेल्डिंग करून, त्याची डागडुजी करून त्याचा कार छान दिसावी यासाठी वापर केला. रिक्षाचे टायर पुढे लावले. पेट्रोलपंप बसवला. बाकी कार्समध्ये असते तशी स्टेअरिंग, क्लच, ब्रेक, मॅन्युअल गिअर आणि एक्सलरेटर या सगळ्याची सोय त्याने याच्याही या आगळ्यावेगळ्या कारमध्ये करून घेतली.
थोडक्यात, त्याच्याकडच्या गाड्यांच्या जुन्या आणि टाकाऊ भागांचा अतिशय हुशारीने आणि कल्पकतेने या कारच्या निर्मितीसाठी वापर केला. ज्याच्याकडून एखादी गोष्ट घडायची असते त्याला ती गोष्ट घडायला एखादं छोटंसं निमित्तही पुरेसे असते. ही कार तयार व्हावी अशी दत्तात्रय लोहार यांच्या मुलाची इच्छा होती. भल्याभल्या इंजिनियर्सनाही अशक्य वाटेल अशी ही कल्पना या हुशार माणसाने केवळ 50 ते 60 हजार इतक्याच खर्चात प्रत्यक्षात उतरवली. तेही इंजिनियरिंगची कुठलीही पदवी नसताना, फारसं शिक्षण झालेलं नसताना.
एखाद्या बाइकला किक मारली, की जशी ती सुरू होते तशाच प्रकारच्या ‘किकस्टार्ट’ची सोय या कारमध्ये आहे. 1 लिटर पेट्रोल मध्ये 40 ते 50 किलोमीटर इतका ॲव्हरेज या कारचा आहे. नॅनोपेक्षाही हा ॲव्हरेज जास्त असल्याचे सांगितलंय.
कारला दरवाजे नाहीत त्यामुळे ओपन जिप्सी कार, किंवा महिंद्रा थार सारखी ही कार भासू शकते. शिवाय ही ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ असलेली कार आहे. दत्तात्रय यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, पण थेट महिंद्रा ग्रुपचे चेअरमन ‘आनंद महिंद्रा’ यांनी दत्तात्रय यांचं कौतुक करणारं ट्विट केलं तेव्हा खऱ्या अर्थाने दत्तात्रय यांच्या कष्टाचं सोनं झालं आणि कल्पकतेची दखल घेतली गेली.
This clearly doesn’t meet with any of the regulations but I will never cease to admire the ingenuity and ‘more with less’ capabilities of our people. And their passion for mobility—not to mention the familiar front grille pic.twitter.com/oFkD3SvsDt
— anand mahindra (@anandmahindra) December 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते असं लिहितात, “ही कार नियमांमध्ये बसणारी नाही. पण आपल्याकडच्या लोकांच्या कल्पकतेचं आणि कमीत कमी उपलब्ध साहित्यातून जास्तीत जास्त निर्मिती करण्याच्या क्षमतेचं कौतुक करायला मी कधीही आढेवेढे घेणार नाही.” त्यानंतर त्यांनी या माणसाच्या चारचाकी कारचा व्हिडियो शेअर केला आहे.
या व्हिडियोत दत्तात्रय आपल्याला या कारविषयी माहिती देताना, ती कशी चालवायची हे सांगताना दिसतात. ‘आनंद महिंद्रा’ यांनी आधीच्या त्या ट्विटनंतर आणखीन एक ट्विट केलंय.
त्यात ते असं म्हणतात, “ही कार नियमात बसणारी नाही त्यामुळे स्थानिक अधिकारी आज ना उद्या दत्तात्रय यांना ही कार वापरण्यापासून रोखतील, पण मी त्या बदल्यात त्याला स्वतः ‘बोलेरो कार’ देणार आहे. आमच्याकडच्या लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून त्याची ही निर्मिती ‘महिंद्रा रिसर्च व्हॅली’वर दाखवली जाऊ शकते. कारण, कमीत कमी उपलब्ब्ध साहित्यात जास्तीत जास्त उपयुक्त निर्मिती करणे हेच खऱ्या अर्थाने शक्कल लढवणं आहे.”
भारत हा ‘जुगाड चॅम्पियन’चा देश असल्याचा आनंद महिंद्रा यांना अभिमान आहे. ते अनेकदा अशा जुगाड प्रयोगांना जाहीरपणे प्रोत्साहन देत असतात.
आनंद महिंद्रा कायमच अशा कल्पकतेचं कौतुक करत आले आहेत. यापूर्वीही एका व्यक्तीच्या ‘टिपर ट्र्क’ च्या निर्मितीचा व्हिडियो त्यांनी शेअर करत जरी तो ट्र्क असुरक्षित असला तरी लोकांच्या चिकाटीने आणि बुद्धिमत्तेने आपण अचंबित होतो असं म्हटलं होतं.
● दत्तात्रय यांच्याविषयी
दत्तात्रय यांचा जन्म लोहार कुटुंबात झाला. घरात परंपरागत कौशल्य होतं आणि जोडीला भन्नाट आयडिया होत्या. दत्तात्रय यांनी फॅब्रिकेशनचं वर्कशॉप टाकलं. याआधी याच छोटेखानी वर्कशॉपमध्ये त्यांनी शेतातल्या मशागतीसाठी भांगलण तसंच पवनचक्की ही यंत्रं बनवली आहेत.
वर्कशॉपमध्ये भंगारातल्या दुचाकीचं इंजिन घेतलं, त्याला रिक्षाची चाकं आणि जीपचं बोनेट लावलं. अशाच आणखी साठवलेल्या स्पेअरपार्टमधून त्यांनी तीन वर्षांमध्ये स्वतःची अशी खास चारचाकी गाडी बनवली.
ही जुगाड जीप जेव्हा रस्त्यावरुन जाते तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही असं गावकरी सांगतात. जीपला 50 ते 60 हजार रुपये खर्च आला असं ते सांगतात. “मी जी काही कमाई करायचो त्यातून बचत करून मी ही जीप बनवत होतो. माझं गावात एक छोटसं दुकान आहे. खुरपी लावणं, धार काढणं, वेल्डिंग अशी काम करतो. जर 500 रुपये कमवत असेन तर त्यातले 300 रुपये घरखर्चाला द्यायचो. आणि उरलेल्या पैशात जीपसाठी साहित्य आणायचो. घरातले म्हणायचे की यावर कशाला इतका खर्च करता ”
दत्तात्रय यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी तीन मुली आणि एक मुलगा आहे. “मुली मोठ्या व्हायला लागल्या तशी त्यांनी वडिलांकडे आपल्याला सगळ्यांना बसायला फोर व्हिलर गाडी हवी अशी इच्छा व्यक्त केली. मला माहित होतं गाडी काही मला घेता येणार नाही. म्हणून म्हटलं आपण तयारच करू”. आपल्या छोट्याशा कुटुंबाला सामावून घेईल अशी छोटी जुगाड जीप तयार झाली.