सोलापूर : परिवहन उपक्रम हा महापालिका प्रशासनातील एक अविभाज्य भाग आहे. अशा वेळी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून महापालिका आयुक्तांनी अगदी कमी संख्या असलेल्या परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू न करणे ही दुजाभाव करणारी बाब आहे. तातडीने सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा; अन्यथा महापालिका परिवहन उपक्रमातील कामगार, कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बुधवारी महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
दरम्यान, परिवहन कामगारांचे सध्या अतोनात हाल होत आहेत. अशावेळी त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कामगार नेते तथा नगरसेवक ॲड. यु. एन. बेरिया यांनी दिला आहे. परिवहन उपक्रमाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. उपक्रमाकडे कायमस्वरुपी व्यवस्थापक नसल्यामुळे परिवहन कामगारांचे अतोनात नुकसान होऊन हाल होत आहेत. त्यामुळे परिवहन उपक्रमाकडील सेवकांना महापालिकेच्या कामगारांना ज्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनस्तर लागू करण्यात आला आहे.
Transport workers preparing for agitation due to damage done to pay commission
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्याच धर्तीवर परिवहन उपक्रमाकडील सर्व कार्यरत सेवकांना व सेवानिवृत्त सेवकांनाही तातडीने आदेश काढून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनस्तर लागू करावे आणि न्याय हक्क द्यावा. सध्या परिवहन उपक्रमाकडे फक्त २५० कायम कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे याचा अधिक बोजा देखील पडणार नाही. वास्तविक परिवहन उपक्रमासाठी ठोस कृती आराखडा तयार करुन उपाययोजना करणे व खात्यास ऊर्जितावस्था प्राप्त करुन नागरिकांना सेवा देणे जरुरीचे आहे. परंतु प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
आता प्रशासनाने याकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शिवाय परिवहन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा; अन्यथा नाईलाजास्तव कामगारांना तीव्र आंदोलन करावे लागेल. यामुळे होणाऱ्या नुकसानीस व परिणामास प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही ॲड. बेरिया यांनी पत्राद्वारे दिला आहे.