बार्शी : वैराग नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदी सुजाता संगमेश्वर डोळसे तर उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे निरंजन भूमकर यांची आज शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीकरता आज झालेल्या विशेष सभेत या निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी केली. डोळसे या वैराग ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच होत्या. त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळातच ग्रामपंचायतच्या नगरपंचायतीतील रुपांतरणाची प्रारंभिक प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर अस्तितत्वात आलेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी निवड होण्याचा योग देखील त्यांनाच लाभला.
त्या ग्रामपंचायतीच्याही पहिल्या महिला सरपंच होत्या आणि नगरपंचायतीच्याही पहिल्या महिला नगराध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे त्या भाग्यवान ठरल्या. नूतन पदाधिकार्यांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. Vairag Nagar Panchayat: Dolse as the Mayor and Bhumkar as the Deputy Mayor
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील डोळसे या एकमेव नगरसेवक आहेत. त्यामुळे आरक्षणाची घोषणा झाल्यानंतरच त्यांचे नगराध्यक्षपद नक्की झाले होते.
आज त्याच्यावर औपचारिक शिक्कामोर्तब झाले. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली दोन तृतीयांश बहुमताने सत्ता आली आहे. नगराध्यक्षपद आरक्षित झाल्यामुळे उपनगराध्यक्षपद भूमकर स्वीकारणार हे स्पष्ट होते. त्यामुळे दोन्हीही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्या आहेत.
यावेळी नगरसेविका तृप्ती भूमकर, नगरसेविका राणी आदमाने, जयश्री घोडके, अनुप्रिया घोटकर, पद्मिनी सुरवसे, आसमा मिर्झा, गुरुबाई झाडमुके, नागनाथ वाघ, अतुल मोहिते, अजय काळोखे, अक्षय ताटे आदी नगरसेवकांसह मृणाल भूमकर, बाळासाहेब भुमकर, तालुकाध्यक्ष राजकुमार पोळ, मारूती ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. पीठासीन अधिकारी अरुणा गायकवाड यांना मुख्याधिकारी विना पवार यांनी निवड प्रक्रियेस सहाय्य केले.