मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. देश ज्या पद्धतीने चालवला जात आहे ते योग्य नाही, विकासाच्या मुद्यावर एकत्र काम करायला हवं, अशी भूमिका तिन्ही नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली. चंद्रशेखर राव आणि शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. तर उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि चंद्रशेखर राव यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. दुसरीकडे तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी तेलंगना सरकारचं बरंच कौतुक देखील केलं आहे. मात्र, यावेळी राजकारणाऐवजी विकासाबाबत आमची चर्चा झाली असल्याचं पवारांनी सांगितलं.
शरद पवार म्हणाले की, ‘आजची बैठक ही वेगळी होती कारण की, आज देशासमोर ज्या समस्या आहेत जसं की, बेरोजगारी, गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समस्यांवर सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. आजच्या घडीला विकासाचा मुद्दा महत्वाचा असल्यानं जास्त राजकारणाबाबत चर्चा केलेली नाही. देशात कुठेही नाही असे पाऊल तेलंगणात शेतकऱ्यांसाठी उचललं आहे. त्यामुळे तेलंगणाने एक प्रकारे देशाला शेतकऱ्यांबाबत एक नवा रस्ताच दाखवला आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘तेलंगणाचे मुख्यमंत्री, त्यांचे सर्व खासदार आणि नेते हे आज आले होते. त्यांच्यासोबत फक्त विकासाच्या मुद्यावर चर्चा झालेली आहे. देशात जी गरिबी आणि बेरोजगारी आहे त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर जास्त चर्चा झाली. विकासाच्या याच मुद्द्यावर सर्वांनी बसून त्यावर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे लवकरच त्याबाबत देखील ठरवलं जाईल.’ असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी देशपातळीवर सर्वाधिक वेगळ्या पद्धतीची पावले उचलण्यात आली आहेत. एक मार्ग देशाला तेलंगणा राज्याने दाखवला असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. विकास, विकास आणि विकास याच विषयावर आज चर्चा झाली. बेरोजगारी आणि गरीबी सुटका करण्यासाठी पूर्ण देशात माहोल तयार करणे गरजेचे असल्याचे आणि त्यासाठीचे प्रयत्न गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. देशात तिसऱ्या आघाडीबाबतचा यापुढचा कार्यक्रम कधी ? कुठे ? हे निश्चित करणार असल्याचेही ते म्हणाले.
शरद पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे. तसेच एकत्र काम करण्याची गरज असल्याच्या मतावर सहमती झाली आहे. यापुढे देशातील अन्य लोकांसोबतही चर्चा करणार असल्याचे राव म्हणाले. Chief Minister K. Chandrashekhar Rao met Sharad Pawar, discussion lasted for one and a half hours
It was a pleasure meeting with Shri K Chandrashekhar Rao, CM Telangana at my Mumbai residence today.
We discussed various issues of development and cooperation between Telangana and Maharashtra.@TelanganaCMO pic.twitter.com/l2B7BmwXKP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 20, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
देशात भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी बारामतीतून प्रस्ताव आहे. त्यामुळे समविचार पक्ष बारामतीतही भेटू शकतो असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. सर्वांशी चर्चा करून एक बैठक होईल, जे खांद्याला खांदा मिळवून काम करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व लोकांशी बोलणी करून मार्ग करणार असल्याचेही राव म्हणाले. एक अजेंडा देशासमोर लवकरच मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
□ हैदराबादमध्ये ही होणार चर्चा
देशात स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही काही गोष्टीत बदल झालेला नाही. त्यामुळेच देशात नवी अजेंडा घेऊन परिवर्तन घडवणार असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे की, ‘देशाला मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातील वातावरण खराब होता कामा नये. हीच आमची इच्छा आहे. आम्ही देशातील अन्य लोकांशी देखील चर्चा करु. मला वाटतं महाराष्ट्रातून जो लढा सुरु होतो तो यशस्वी होतोच. कारण सध्या जो काही अन्याय सुरु आहे त्याविरोधात आम्हाला लढायचं आहे. त्यामुळे लवकरच देशातील काही नेत्यांसोबत आम्ही एकत्र चर्चा करुन यावेळी हैदराबाद किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी ही चर्चा होईल.’ असं के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी म्हटलं आहे.