पंढरपूर – तालुक्यातील नारायण चिंचोली जवळ रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून जाणाऱ्या अविनाश वसेकर यांना पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. ही घटना काल शनिवारी (ता. १९) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अविनाश वसेकर हे चारचाकी वाहनातून दर्शनासाठी निघाले होते. नारायण चिंचोली येथील साईराज ढाब्याजवळ रस्त्याच्या मध्येच लहान बाळ रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी आपले वाहन उभे करून पाहणी केली. तेव्हा ते पुरुष जातीचे बाळ नुकतेच जन्मलेले असल्याचे आढळले. वसेकर यांनी इतर नागरिकांच्या मदतीने ते बाळ ताब्यात घेतले.
त्याला पंढरपुरातील शितल शहा रुग्णालयात दाखल केले. वसेकर यांनी वेळीच तत्परता दाखवली त्यामुळे बाळाचे प्राण वाचले. त्यानंतर याची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना कळविली. पोलीसांनी अनोळखी इसमाचा विरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंबंधी कोणास माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक फौजदार अशोक जावळे यांनी केले आहे. Newborns found in Pandharpur taluka area; Hospitalized
□ पैशासाठी वृद्ध मातेस मारहाण; मुलाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण अधिनियमाप्रमाणे गुन्हा
सोलापूर – आम्ही वृद्ध झालो आहोत, चालू वर्षाचे उसाचे बिल तुला मिळाले. त्यापैकी काही पैसे आम्हाला देत का नाही? अशी विचारणा करणाऱ्या वृद्ध आईस पोटच्या मुलाने चापटा मारून ढकलून दिल्याची घटना पानमंगरूळ (ता.अक्कलकोट) येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात अक्कलकोट साउथच्या पोलिसांनी त्यांचा मुलगा महेश बसण्णा पडणुरे (वय ४५) याच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण अधिनियम आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यासंदर्भात शिवम्मा बसण्णा पडणूरे (वय ७१) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आपण पतीसोबत घरात बसलो होतो. त्यावेळी माझा मुलगा महेश हा घरात आला होता. तेव्हा आईने आपल्या मुलास आम्ही वृद्ध झालो आहोत, चालू हंगामातील उसाचे बिल तुला मिळाले आहे. त्यातील काहीं पैसे दोघांना देत का नाही? असे म्हणाल्या. त्यावेळी महेश याने तुम्हाला पैसे देत नाही. काय करायचे ते करा. असे म्हणत आईला मारहाण करत ढकलून दिले. यापुढे शेती मागितल्यास दोघांना खल्लास करतो. अशी धमकीही मुलांनी दिली. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत .
□ तुंगत येथे रॉडने मारहाण तरुण जखमी
तुंगत (ता.पंढरपूर) येथील फौजी हॉटेल जवळ जागेच्या वादातून रॉड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव कांबळे (वय ३५ रा.तुंगत) हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप गायकवाड, अविराज गायकवाड आणि अन्य दोघांनी मारहाण केली अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.