■ महापालिकेने भूसंपादन करून जागा ताब्यात दिल्यानंतर दोघांमध्ये खर्च फिफ्टी – फिफ्टी
सोलापूर : आसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरण म्हणजे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर ! असाच प्रकार होत असल्याचे दिसून येते. रुंदीकरणासाठी आवश्यक जागा आणि खर्च आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या सोलापूर महापालिकेला द्यावा लागणार आहे. रेल्वे रूळ आणि पूल रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असताना महापालिकेने भूसंपादन करून जागा ताब्यात दिल्यानंतर दोघांमध्ये खर्च फिफ्टी – फिफ्टी द्यायचा आहे. विनाकारण महापालिका हा भुर्दंड का सहन करणार ? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अरुंद असलेल्या आसरा रेल्वे पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे त्रास सहन करावा लागतो. अपघात होतात. यामुळे या पुलाच्या रुंदीकरणाचा विषय पुढे आला. दरम्यान, आसरा रेल्वेब्रिज रुंदीकरणासाठी महापालिकेने आपले पाऊल पुढे टाकले. यानुसार रेल्वे विभागाकडे पाठपुरावा देखील सुरू ठेवला. यासंदर्भात महापालिका आणि रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. मात्र महापालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी यांनी तर रेल्वे विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूल रुंदीकरण जागा पाहणीसाठी पाठ फिरविली.
सोलापूर रेल्वे विभाग या ठिकाणी रेल्वेचे तिहेरीकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे रेल्वेला देखील अधिक गरज आहे. ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. आसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरणासाठी जागा भूसंपादन करून ब्रिजचा खर्च महापालिकेच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न रेल्वे विभागाकडून होत असल्याचे प्रकार रेल्वे ब्रीज जागा पाहणीवेळी पुढे आले आहे. Asara railway bridge widening; Someone’s burden on someone’s shoulders!
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महापालिकेचे नगरअभियंता संदीप कारंजे आणि रेल्वे विभागाचे विभागीय अभियंता जगदीश प्रसाद यांनी पाहणी करून एकमेका विभागाची भूमिका स्पष्ट केली.
रेल्वे विभागाने आसरा रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करण्यासंदर्भातील महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिली. शिवाय या ब्रिजच्या दोन्ही बाजूची जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी यानंतर रेल्वे विभाग या रुंदीकरणाससह ब्रिजला येणारे खर्च महापालिकेला दाखविणार असून हे खर्च दोघांमध्ये खर्च करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वास्तविक पहाता रेल्वे विभागाला रेल्वेच्या तिहेरी करण्यासाठी पुलाचे रुंदीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे. यावर मात्र आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून पुढे बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आसरा रेल्वे ब्रिज रुंदीकरण करण्यासाठी रेल्वे विभागाने महापालिकेसमोर दोन्ही बाजूची जागा उपलब्ध करून देणे आणि येणाऱ्या खर्चात सहभागी होण्यातची स्पष्टोक्ती केली आहे.
आर्थिक स्थिती बिकट असलेल्या महापालिकेला सध्या बायपास रोड, उड्डाणपूल व विविध योजनांमधील विकासकामांसाठी लागणाऱ्या हिस्सा रकमेसाठी पैसा उपलब्ध नसून बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज काढावे लागत आहे. अशा स्थितीत रेल्वे ब्रीजसाठी जागा भूसंपादन आणि खर्च देऊ शकणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे रुंदीकरण काम होणार की नाही का पाहणीचा फार्स ठरणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.