नवी दिल्ली / कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले आहे. त्यानंतर भारताने युक्रेनला मदत करावी, मध्यस्थीसाठी पुढे यावे, अशी विनंती युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करावी, मोदी या प्रकरणात पुतिन यांच्याशी बोलू शकतात, त्यामुळे हे युद्ध थांबवण्यास रशियाला भारतानं सांगावं, असे राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी म्हटले.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना आवाहन करत त्यांनी याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ बोलायला हवे. युक्रेनच्या राजदूतांनी सांगितले की, राजधानी कीवजवळही हल्ले झाले आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. पंतप्रधान मोदी खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना यावेळी मदतीचे आवाहन करतो. जगातील तणाव केवळ भारतच कमी करू शकतो. त्यांनी सांगितले की, युक्रेनकडून पाच रशियन विमाने पाडण्यात आली आहेत.
युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान मोदींना मदतीची विनंती केली असली तरी या संपूर्ण प्रकरणावर भारताची तटस्थ भूमिका आहे. भारत कोणत्याही बाजूने बोललेला नाही. तसेच या घडामोडीबाबत पंतप्रधान मोदींनी अद्याप ट्विट केलेले नाही. त्याचबरोबर युक्रेनच्या मुद्द्यावर सध्या आम्ही तटस्थ आहोत, असे परराष्ट्र राज्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही ते म्हणाले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरावर बॉम्बहल्ले होत आहेत. याच पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय नागरिकांना याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सावधानतेचा सूचना देत असल्याचे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे. या भारतीय नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. India should help, request Ukraine; Call for help to a Marathi boy stranded in Ukraine
रशियाने युक्रेनवर ‘लष्करी कारवाई सुरू केली आहे. पण हे आपल्यावर आक्रमण असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. युक्रेनमध्ये 18 हजार भारतीय अडकले आहेत. नागपूरचा पवन मेश्राम युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क शहरातून पवनने एक व्हीडिओ पाठवला आहे, अधिक माहितीसाठी व्हिडिओ व्हायरल झालाय. युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. त्यामुळे युक्रेनच्या सैन्यानेही लढाईची तयारी सुरु केली आहे. युक्रेनने आपल्या सैन्यात मोठ्या प्रमाणात महिलांची भरती केली आहे. युक्रेन या महिलांना मूलभूत लढाऊ प्रशिक्षण देऊन युद्धभूमीवर उतरवणार आहे. दरम्यान, 30 हजारांहून अधिक महिला लष्करात दाखल झाल्या असल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक निवेदन जारी करून रशियाने हल्ला केल्याचे म्हटले आहे. ‘रशिया शांतताप्रिय युक्रेनच्या लोकांवर हल्ला करत आहे, ज्याला आम्ही उत्तर देऊ आणि आम्ही जिंकू’, असं त्यांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. जगभरातील देशांकडून रशियाच्या या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.
युक्रेनच्या लष्करानेदेखील जोरदार प्रतिकार सुरू केला असून आतापर्यंत 50 रशियन सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे.
दरम्यान , रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही झाला आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. सप्टेंबर 2014 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 101.34 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. रशिया जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. दरम्यान भारतात येत्या काही दिवसात पेट्रोलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारांसह पेट्रोल आणि सोन्याच्या किमतीवरही पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर तब्बल 850 रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत आज (24 फेब्रुवारी) 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे दर 46850 रुपये आहेत. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे दर 51110 रुपये आहेत. दरम्यान सेन्सेक्समध्ये आज तब्बल 2000 अंशांची घसरण झाली आहे.
□ युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. अडचणीत असलेले नागरिकांना मदतीसाठी दुतावासाच्या वेबसाईट, सोशल मीडिया आणि दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे. या शिवाय दूतावासाने हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. मदतीसाठी नागरिकांना +38 0997300428, +38 0997300483, +38 0933980327, +38 0635917881, +38 0935046170 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला करत युध्दाला सुरुवात केली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये तब्बल 18 हजार भारतीय अडकले आहेत. भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान गेले असता युध्द सुरू झाल्याने अर्ध्या वाटेतून माघारी परतले. त्यामुळे भारताचे टेंन्शन वाढले आहे. त्यासाठी भारतीयांच्या मदतीसाठी भारत सरकारने हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. दरम्यान, ही हेल्पलाईन 24 तास सुरु असेल.