□ टँकर चालक वाहक जेवायला थांबले अन वाचले
मोहोळ/ विरवडे बु : टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चार हजार लिटर्स क्षमतेच्या मोलॅसिस टाकीत गॅसचा स्फोट झाल्याने टाकी फुटून दुर्घटना घडली. यात एक कामगार जागीच ठार झाला आहे तर दुसरा किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी, भीमा सहकारी साखर कारखान्याचा सध्या गळीत हंगाम सुरू आहे. रसायन विभागाच्या चार हजार लिटर्स क्षमतेच्या दोन टाक्या आहेत. यापैकी एका टाकीतून मोलॅसिस टाकीमध्ये भरण्याचे व वितरण करण्याचे काम चालू होते.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका टाकीत गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे सुमारे १८०० ते २००० लिटर मोलॅसिस असलेली टाकी फुटली. या स्फोटामुळे रसायन विभागात काम करणारे विष्णू महादेव बचुटे( रा.औंढी वय – ५९ ) हे जागीच ठार झाले तर प्रयोगशाळा सहाय्यक ऋषिकेश शिवाजी शिंदे ( रा.अंकोली वय २५ ) , दादाराव रघुनाथ निकम (रा. लांडगेवाडी ता. कवठे महांकाळ ) व ट्रक चालक सागर तानाजी जाधव (रा. कुची ता. कवठे महाकाळ) असे तिघेजण जखमी जखमी झाले. हा या घटनेत किरकोळ जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशनला जाऊन या संदर्भात रीतसर माहिती दिली. दरम्यान या घटनेतील मयत विष्णू महादेव बचुटे याचे प्रेत शवविच्छेदनसाठी मोहोळला हलवण्यात आले असून या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
Molasses tank rupture accident at Bhima factory; One killed and three injured
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याप्रकरणी मृत विष्णू बचुटे यांचा मुलगा महेश बचुटे याने भीमा सहकारी साखर कारखान्यात वडील विष्णू बचुटे काम करत असलेल्या युनिटची देखरेख, सुरक्षा इत्यादी बाबत उत्पादन विभाग केमिस्ट सुब्राव पडळकर यांनी सदर टाकीची कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता निष्काळजीपणा केल्याने टाकी फुटून त्यात वडील विष्णू बचुटे यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.
● घटना अत्यंत ‘दुर्दैवी’
मोलॅसिसची टाकी फुटुन कारखान्यामध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कारखान्याच्या झालेल्या नुकसानीपेक्षा एका कामगाराच्या जाण्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून बचुटे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या परिवाराच्या भविष्यासाठी आम्ही सकारात्मक विचार करू.
– सतीश जगताप, उपाध्यक्ष
भीमा साखर कारखाना
□ अनर्थ टळला, जीव वाचला
दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने शिंदे हात पाय धुण्यासाठी थोड्या अंतरावर गेला तर बचूटे हे तिथेच बसून जेवण करण्यासाठी थांबले असताना ही टाकी फुटली. तर जवळच मळी वाहतूक करणारे दोन टँकर उभे होते. टाकी फुटून मळीच्या दाबाने दोन्ही टँकर ३ ते ४ फूट साईडला गेले. त्या टँकरमध्ये चालक व वाहक जेवत होते. त्यामुळे ते बचावले, मात्र किरकोळ जखमी झाले. त्य टाकी फुटली असताना द्रवरूप मोलॅशिसने जवळच्या साखर गोडाऊनचे दोन्ही शटर तुटून मोठ्या प्रमाणात साखर भिजून नुकसान झाले आहे.