● पक्षाकडे तरूण, विद्यार्थी वर्गाला आकृष्ट करण्यासाठी होणार फायदा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर पक्षाने सोपवलेली जबाबदारी मोठी समजली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना केल्यानंतर अध्यक्षपदी आदित्य शिरोडकर यांची निवड केली होती. दरम्यान, शिरोडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर अमित ठाकरे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
अमित ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून राजकारण विशेष सक्रिय दिसत आहेत. मनसेच्या मुंबई, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये, सभांमध्ये त्यांची उपस्थिती दिसते. Big decision of MNS, new responsibility handed over to Amit Thackeray
मनापासून अभिनंदन pic.twitter.com/MvsFn3yn2d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 27, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आज मनसेने अधिकृत पत्रक काढले असून त्यात ”आज मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
अमित ठाकरे यांच्यावर तरुण आणि विद्यार्थी वर्गाच्या नेतृत्वाची जबादारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना दिलेली ही जबाबदारी महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
□ भाषा दिनाचे औचित्य साधून आदित्य शिरोडकरांचे रिक्त पद भरून काढले
राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीत मनसे ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हे पद रिक्त होते. या पदावर अमित ठाकरे यांची निवड करण्याची मागणी पक्षातून होत होती. अखेर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अमित ठाकरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडे तरूण, विद्यार्थी वर्गाला आकृष्ट करण्यासाठी अमित यांच्या निवडीमुळे फायदा होऊ शकतो.
काही वर्षांमध्ये मनसेला लागलेली घरघर पाहता मराठी युवकांना पुन्हा मनसेकडे वळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यातूनच अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी संघटनांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. नुकत्याच एका मराठी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि संस्कृती यांबाबत अग्रही भूमिका मांडली. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर जोरदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.
◇ मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये ? – राज ठाकरे
पुण्यातील एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेविषयी एक परखड प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? तसेच ‘मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.