नवी दिल्ली : देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्षातून नाराजीचे सूर उमटत आहेत. गांधी कुटुंबियांनी पद सोडावे, अशी मागणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बाहेरही एक काँग्रेस आहे, नवीन लोकांना संधी द्यावी, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. दरम्यान सिब्बल यांच्यासह 23 मोठे नेते गांधी कुटुंबियांवर नाराज असल्याची चर्चा आहे.
पाच राज्यातील काँग्रेसचा दारुण पराभव, नेतृत्व बदलाची मागणी, काँग्रेसमधून नेत्यांचे होणारे पलायन अशा अनेक मुद्द्यांवरून आता काँग्रेसच्या जुन्या, ज्येष्ठ नेत्यांचा व्यथा समोर येत आहेत. आज जवळपास 130 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसची अशी अवस्था केव्हा झाली नव्हती. काँग्रेसच्या या दारुण पराभवामुळे काँग्रेसचे जुने नेते चिंतेत असून नेतृत्व बदलाची मागणी जोर धरतेय. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सिब्बल म्हणाले की, ‘राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नसून सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत, असे आम्ही गृहीत धरत आहोत. पण राहुल गांधी पंजाबमध्ये जाऊन चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करतात. ते असे काम कोणत्या अधिकारात करतात? ते पक्षाचे अध्यक्ष नसून सर्व निर्णय घेतात. एक प्रकारे तेच खरे काँग्रेस अध्यक्ष आहेत. अशा स्थितीत काँग्रेसमधील माणसे पुन्हा त्यांना लगाम द्या, असे का म्हणत आहेत? तर वास्तव हे आहे की तेच खरे अध्यक्ष आहेत. अर्थात ते विधिवत काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरी फरक पडणार नाही.
काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशी मागणी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये कपिल सिब्बल पहिले नेते आहेत. ज्यांनी सोनिया गांधी यांनी पायउतार व्हावे असे उघड आवाहन केले होते. तसेच गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडून दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. Gandhi family should resign – Congress leader Sibal
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कपिल सिब्बल म्हणाले की, काही लोक काँग्रेसमध्ये आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेर आहेत. पण खऱ्या काँग्रेससाठी आणि प्रत्येकाच्या काँग्रेससाठी काँग्रेसच्या बाहेरच्या व्यक्तीने ऐकले पाहिजे. काँग्रेसची ज्या प्रकारे अधोगती होत आहे, ते मला पाहवत नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससाठी लढत राहणार असल्याचे ते म्हणाले.
एका वृत्त संस्थेशी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व कोकिळेच्या भूमीत राहत आहे. (म्हणजे सर्व काही ठीक आहे असे त्यांना वाटते. मात्र वास्तवाशी काहीही संबंध नाही.) 8 वर्षांपासून पक्षाची सतत पडझड होत असतानाही जर ते सावध झाले नाहीत, तर ती काँग्रेससाठी दुर्दैवाची बाब आहे.
कपिल सिब्बल म्हणाले की, सोनिया गांधी यांनी स्वतः नेतृत्वाच्या भूमिकेतून पायउतार व्हावे. कारण काँग्रेसने नेमलेल्या समितीकडून त्यांना कधीही पद सोडण्यास सांगितले जाणार नाही. यामागचे कारण म्हणज काँग्रेस नेतृत्त्वानेच स्वतः त्या समितीतील सर्व लोकांची निवड केली आहे.
विशेष म्हणजे 2020 मध्ये काँग्रेसमध्ये सुधारणांच्या मागणीसाठी 23 नेत्यांचा गट तयार करण्यात आला होता. आता या गटातील नेते उघडपणे काँग्रेस नेतृत्वावर सवाल करत आहेत. या सर्व मुद्द्यांवरून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या कपिल सिब्बल आपल्या व्यथा मांडत आहेत, मात्र, त्यांचे ऐकून घेणारे कोणी नाही.
कपिल सिब्बल म्हणाले की, “या देशात लाखो लोक आहेत जे कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत, परंतु ज्यांची विचारप्रक्रिया सर्वसमावेशकता, एकता, शांतता, सौहार्द आणि भविष्यातील बदलासाठी काँग्रेसच्या विचार प्रक्रियेशी मिळती जुळती आहे. असे लाखो लोक आहेत ज्यांचा हेतू सर्वसामान्यांचे कल्याण, गरिबी दूर करणे, निरक्षरता दूर करणे आहे. असे लोक त्यांच्या विचारप्रक्रिया काँग्रेसी आहे. यालाच मी सर्वांची काँग्रेस म्हणतो. काही लोकांनी आपली मते मांडली. ते कोणीही असू शकते – A, B, C, कोणीही. पण घराणेशाहीच्या काँग्रेसमुळे सर्वांसाठीचा काँग्रेस चालू शकत नाही, असे या अ.भा.वाल्यांना वाटते हे दुर्दैव आहे. हे आमच्यासाठी आव्हान आहे. मी कोणत्याही ABC च्या विरोधात नाही पण आम्हाला हे आव्हान स्वीकारावे लागेल.