सोलापूर – भावकीतील वैमनस्यातून झोपेत उकळते तेल अंगावर टाकून एकाचा खून करण्याचा प्रयत्न सोलापुरातील सापटणे येथे झाला आहे. यात दोघांवर टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. Dispute of brother-in-law: Murder by pouring boiling oil on the body in Solapur, case filed against both
भावकीतील वैमनस्यातून झोपेत असताना अंगावर उकळते तेल टाकून एका ५५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला. ही घटना सापटणे (ता.माढा) येथे काल सोमवारी (ता.6) पहाटेच्या सुमारास घडली. शहाजी गोविंद ढवळे (वय५५ रा. सापटणे) असे मयताचे नाव आहे. त्यांचा खून केल्याप्रकरणी संतोष राजेंद्र ढवळे (वय ३०) आणि नरसिंह राजेंद्र ढवळे (वय ३२ दोघे रा.सापटणे) या यांच्याविरुद्ध टेंभुर्णीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहाजी ढवळे आणि त्यांची पत्नी अनिता ढवळे असे दोघे रविवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी अनिता या पिकास पाणी देण्याकरिता दरवाजा उघडा ठेवून गेल्या होत्या. साधारणतः दीड वाजेच्या सुमारास शहाजी यांच्या अंगावर उकळते तेल फेकल्याने ते झोपेतून खडबडून जागे झाले. तेव्हा पळून जाताना संतोष ढवळे आणि नरसिंह ढवळे हे त्यांना उजेडात दिसून आले.
त्यानंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात (राहुल) मुलगा यांनी दाखल केले. उपचारादरम्यान शहाजी ढवळे हे आज मंगळवारी सकाळी मरण पावले. दरम्यान त्यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जवाबावरून पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार ओमासे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/556586976019036/
□ तलवारीचा धाक दाखवून लुटमार
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे तलवारीचा धाक दाखवून रोख रकमेसह लाखाचे दागिने लुटले आहेत. आरोपी निष्पन्न झाले असून ५ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
घरात घुसून तलवार आणि चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखाचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. ही घटना उळेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील डोंबाळेवस्ती जवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात तालुक्याच्या पोलिसांनी ५ जणांविरुद्ध दरोडा आणि शस्त्र अधिनियमाचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात मारुती दत्तू शिंदे (वय ३६ रा. उळेगाव,डोंबाळेवस्ती जवळ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ते आपल्या घरात होते. त्यावेळी संतोष मच्छिंद्र चव्हाण (रा.तळेहिप्परगा) यांच्यासह ५ जणांनी घरात घुसून त्यांना तलवार आणि चाकूचा धाक दाखविला. २१ ग्रॅम सोन्याचे दागिने,२० हजार रुपये रोख आणि मोबाईल असा १ लाख ४ हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला. त्याप्रमाणे पोलीसांनी संतोष चव्हाण याच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्तिक करीत आहेत.
□ विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – जुना विजापूर नाका परिसरातील अंबिका नगरात राहणाऱ्या एका३५ वर्षीय विवाहित तरुणांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. 6) सायंकाळच्या सुमारास घडली.
सुरज चंद्रकांत बनसोडे (वय ३५ रा. अंबिकानगर) असे मयताचे नाव आहे. काल सायकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी मृतदेह खाली घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत सुरज हा रंगकाम करीत होता.
या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. फौजदार वाल्मिकी पुढील तपास करीत आहेत .
https://www.facebook.com/109399567404448/posts/556494316028302/