महाविकास आघाडीचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गेल्या दहा दिवसांपासून सत्ता नाट्याचा जो महाअंक सुरू होता, तो संपुष्टात आला आहे. राज्यावर जी अस्थिरता आली होती. ती देखील दूर झाली आहे. या राज्याला नवे सरकार देण्याची जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे. The battle is lost, the mind is won; Rebellion became an excuse but real conspiracy politics
भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार यांच्यात नव्या सत्तेसाठी धिंगाणा सुरू होईल. तो कसा असेल हे राज्याने पहात बसावे. शिवसेनेतील स्वकीयांनीच बंड केल्यामुळे ठाकरे यांची मोठी अडचण झाली. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळली गेल्याने ठाकरे यांचा नाईलाज झाला आणि अखेर त्यागपत्र द्यावे लागले. कारण गुरुवारी ते बहुमत सिद्ध करूच शकले नसते.
नसत्या फुशारक्या न मारता वेळीच त्यांनी राजीनामा देऊन स्वतःची, शिवसेनेची आणि महाराष्ट्राची शान राखली. सत्ता येते आणि जाते. त्याची फिकीर न करता ठाकरे यांनी अत्यंत शांतपणे या पदावर पाणी सोडले. रात्री फेसबुकवर त्यांनी जनतेशी संवादही साधला. अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केले, त्याची त्यांनी उजळणी केली. त्यांनी केलेले भाषण भावस्पर्शी होते. मराठी माणसाच्या मनाला चटका लावणारेही होते. माझ्याच लोकांनी मला धोका दिला, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.
शिवसेनेने आतापर्यंत चार मोठे बंड पचवले. स्वकीयांनीच ‘मातोश्री’ च्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्याची तमा न बाळगता शिवसेना पुन्हा उभी केली. तीच हिम्मत व तोच जोष उध्दव यांच्या भाषणात दिसून आला. आता केवळ शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी विधान परिषदेचाही राजीनामा देऊन टाकला. एकंदरीत हे असले हिडीस राजकारण नकोच, अशी त्यांची संतप्त भावना त्यामागे दिसते. ही त्यांची भावना राज्याला पटण्यासारखींच आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571917071152693/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राजकीय क्षेत्र चांगल्या व्यक्तींसाठी राहिलेले नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यांची सत्ता जाण्याला बंडखोर हे एक निमित्त झाले पण खरे कटकारस्थान भाजपने शिजवले. आपल्याला सत्तेत पुन्हा येऊ दिले नाही तसेच दोन काँग्रेसशी घरोबा करून सत्ता घेतली. हा राग देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात बसला होता. हा राग त्यांनी विविध मार्गांनी आघाडीच्या सरकारवर काढला. त्यात ईडीचे हत्यार वापरून शिवसेनेच्या नेत्यांना त्रास दिला.
नवाब मलिक व अनिल देखमुख यांच्यासारख्या नेत्यांना तुरुंगाची हवा दाखवली. अडीच वर्षात जो राजकीय गदारोळ झाला, त्याला ठाकरे वैतागले होते. असल्या वातावरणात काम करण्याऐवजी निघून गेलेले बरे, अशी त्यांची मानसिकता झालेली होती. उध्दव हे उत्तम संघटक आहेत. बाळासाहेब निवर्तल्यानंतर ते हिमतीने उभे राहिले. राज्य पिंजून काढत त्यांनी सेना उभी केली.
२०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समोर शरद पवारांचा तगडा राष्ट्रवादी पक्ष उभा असतानाही त्यांनी अधिक आमदार निवडून आणत दुसरा बहुमान मिळवला. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान हे निर्णय त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेच शिवाय बुधवारी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे केले. तसेच उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा ऐतिहासिक – निर्णय घेतला गेला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नामांतराच्या मागणीला ज्यांनी सातत्याने विरोध केला, त्या दोनही काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध केलेला नाही.
राज्यावर करोनाचे संकट आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रशासनावर वचक ठेवत आरोग्याची सुविधा लोकांपर्यंत पोहचवली. त्यात आजारपण आले. त्यावरही मात करून ते जनतेच्या सेवेत रुजू झाले. बंडखोरांच्या लढाईत ते जरूर हरले पण राज्याचे मन त्यांनी जिंकले आहे. राजकारणात प्रतिकूलता फार दिवस राहात नाही. शिवसेना पुन्हा फिनिक्स झेप घेईलच, असा आमचा विश्वास आहे.
📝 📝 📝
दैनिक सुराज्य, संपादकीय लेखन
https://www.facebook.com/109399567404448/posts/571886844489049/