महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथग्रहण केले. मोदी-शहा या जोडीचा धक्कातंत्र महाराष्ट्राने पहिल्यांदाच अनुभवला. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असा अंदाज बांधला गेला होता. दिल्लीच्या हायकमांडचा आदेश येताच भाजप नेते चक्रावले. Glorious honor … An ordinary worker can become the Chief Minister
राज्यात एकच खळबळ उडाली. कारण शिंदे यांचे नाव कसे काय आले ? या प्रश्नाने साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकले पण उध्दव ठाकरे यांना धडा देण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी हा नवा डाव टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राज्यातील सामान्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे शिंदेंसारख्या एका निष्ठावंत नेत्याला भाजप नेत्यांनी न्याय दिला. शिवसेनेत निष्ठावंतांची कदर होत नाही पण आम्ही करतो, असा संदेश या निर्णयातून दिल्लीश्वरांनी राज्यात पोहचवला आहे.
शिवसेनेतील ज्येष्ठत्व पाहात शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. गेली अनेक दशके शिवसेनेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून शिंदे यांनी पक्ष वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. ठाकरे घराण्यानंतर ते सर्वात शक्तिशाली शिवसैनिक मानले जातात. २०१९ मध्ये ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसते तर आज शिंदे हे त्याच खुर्चीत दिसले असते. सातारा ते ठाणे असा त्यांचा प्रवास विलक्षण आहे.
सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी ही त्यांची जन्मभूमी. ठाण्यात त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ट महाविद्यालय येथे ११ वीपर्यंत शिक्षण घेतले. १९८० मध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे हे ठाण्यातील कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले. पक्षासाठी त्यांनी तुरुंगवासही सोसला. कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक. त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/572509944426739/
२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे वाटले होते. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांना उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे शिंदे यांना घुसमट सहन करावी लागली. अखेर आता त्यांनी बाजी मारली. ‘भगवान की घर में देह है, लकिन अंधेर नहीं’, याचा प्रत्यय शिंदे यांना आला.
शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले. पण आता भाजपने शिंदे यांना हा मान देऊन मास्टर स्ट्रोक खेळला आहे. फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. संपूर्ण ठाकरे सरकारला वेठीस धरणारे शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम त्यांनी एकहाती केले.
सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचे ठरवले. ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना त्यांच्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे. माझा सच्चा सैनिक मुख्यमंत्री झाल्याचे पाहून बाळासाहेब असते तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. सामान्य कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो ही वार्ता ऐकून आम्हालाही मनस्वी आनंद झाला आहे. शिंदे यांना मिळालेला हा बहुमान महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. त्यांच्या कारकिर्दीला आमच्या मनोमन शुभेच्छा.
📝 📝 📜
– दैनिक सुराज्य, संपादकीय लेख
https://www.facebook.com/109399567404448/posts/572489714428762/