□ वाहने अडवून टोल वसुली, पोलिसांची बघ्याची भूमिका
बार्शी : राज्य सरकारने वारकर्यांच्या वाहनाला आषाढी वारीमध्ये टोल माफी दिली आहे. त्यामुळे या वाहनांची टोल मधून मुक्तता झाली आहे. मात्र बार्शी तालुक्यातील रस्त्यांवर पंढरपूरवरुन येणारी वारकर्यांची वाहने अडवून तृतीयपंथिय त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत आहेत. तालुक्यातील पोलिसांना हे माहीत असूनही ते बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे वारकर्यांना या आर्थिक लूटीस सामोरे जावे लागत आहे. Even if the government forgives us, we will have to pay the toll, looting of Warkaris by third parties Solapur
बार्शी तालुक्याला जोडणार्या महत्वाच्या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून तृतीयपंथियांनी उच्छाद मांडला आहे. दोन-तीन च्या गटाने रस्त्यावर मध्यभागी थांबून ते येणारे प्रत्येक खाजगी वाहन अडवित आहेत. वाहनचालकांनी पैसे दिल्याशिवाय ते त्यांचा रस्ता मोकळा करत नाहीत. एखाद्या चालकाने पैसे देण्यास टाळाटाळ केली की अचकट-विचकट बोलून, शिव्याशाप देवून ते त्याचा पानउतारा करत आहेत.
त्यांच्या अवताराला आणि अंगविक्षेप यांना घाबरुन चालक मुकाट्याने खिशातून पैसे काढत आहेत. त्यामुळे त्यांचे फावत आहे. अनेक महिन्यांपासून ही वसुली सुरु आहे. याबाबत अनेकांनी स्थानिक पोलिस अधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ते त्यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे तृतियपंथियांना रान मोकळे मिळाले आहे. याचा त्रास वाहतुकीला होत आहे. तृतीयपंथियांच्या या अगोचरपणामुळे अपघाताचाही धोका संभवत आहे. काही वेळा तृतीयपंथिय आणि वाहनचालकांमधील वादामुळे वाहतूक ही खोळंबते आहे. या लुटीतून दुचाकीचालकांचीही सुटका होत नाही. त्यांना चुकवून वाहन नेवू पहाणार्या चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातून किरकोळ अपघातही झाले आहेत.
सध्या वारी माघारी फिरली आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणार्या वारकर्यांच्या वाहनाची रेलचेल आहे. शासनाने टोल माफी केल्यामुळे वारकरी खूष असले तरी बार्शी तालुक्यात मात्र ही जबरदस्तीची टोल वसुली त्यांच्या आनंदावर विरजण घालत आहे. स्थानिक पोलिस त्यावर कारवाई करत नसल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579513257059741/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ विनयभंग प्रकरणी रिक्षाचालकास एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा
बार्शी : आठवडा बाजारास पायी निघालेल्या विवाहितेवर जबरदस्ती करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दत्तात्रय गहीनीनाथ बारंगुळे (रा. नागोबाची वाडी ता. बार्शी) या रिक्षाचालकाचा अपराध सिध्द झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. विजयकर यांनी त्यास एक वर्ष सक्तमजुरीची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दंडाच्या रकमेतून पिडितेस ८ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे सरकारी वकिल सुनिल जोशी यांनी काम पाहिले.
पिडिता शनिवारी आठवडा बाजार असल्याने दुपारी १ च्या सुमारास बार्शीस निघाली होती. तिला कोणतेही वाहन न मिळाल्याने ती पायीच जात होती. आरोपी रिक्षा घेवून तिच्या पाठीमागून आला. त्याने तिस रिक्षात बसण्याचा आग्रह केला. मात्र तिने नकार दिला. यावेळी रस्त्यावर इतर वाहतूक नव्हती. त्यामुळे त्याने तू मला आवडते असे म्हणत तिचा हात धरुन तिला रिक्षात ओढले. तिने आरडाओरडा करताच त्याने तिला रिक्षातून ढकलून दिले.
हा प्रसंग कोणाला सांगितल्यास मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिली. तिने याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रविकिरण सुभेदार यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले.
याप्रकरणी न्यायालयीन सुनावणीत फिर्यादी, तिची सासू, दोन पंच आणि तपासी अधिकारी यांची साक्ष झाली. पंचांनी पंचनाम्यावरील आपली स्वाक्षरी ओळखली मात्र पंचनामा नाकारला. त्यामुळे त्यांना फितूर घोषित करण्यात आले. त्यांनी उलट तपासणीत अरोपी बरोबर त्यांचे चांगले संबंध असल्याची कबुली दिली.
पीडिताने फिर्यादीत नमूद हकीकत प्रमाणे साक्ष दिली. आरोपीने निर्मनुष्य ठिकाणी तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यास वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचा आरोप सिध्द न झाल्याने त्यातून त्यास मुक्त करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579457987065268/