□ जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे छत कोसळल्याची घटना शनिवारी (ता. 30) घडली. छत कोसळलेल्या खोलीमध्ये पहिलीच्या वर्गातील मुले बसत होती. मात्र शाळा भरण्यापूर्वी छत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटना घडल्यानंतर संतप्त पालकांनी जीर्ण वर्गखोल्या बद्दल चिंता व्यक्त केलीय. Roof collapses before school in Vagdari Akkalkot; A major accident was avoided
काही दिवसांपूर्वी पालकांनी व शाळेने या शाळेच्या खोलीच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला माहिती देत कळवले सुद्धा होते. मात्र, झोपलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. सकाळची शाळा असल्याने मुले शनिवारी लवकर शाळेत आली होती. छत कोसळण्याची घटना रात्री किंवा पहाटे झाली असावी अन्यथा याठिकाणी मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते, असे उपस्थितांनी सांगितले.
जे शाळेचे छत कोसळले त्या खोलीत पहिलीचा वर्ग बसत होता, आणि ३४ चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळा भरण्याअगोदर ही दुर्घटना झाली. त्यामुळे लहान मुलांच्या जीवावरचा धोका टळला. वारंवार शाळेमार्फत दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला जात असला तरी प्रत्यक्षात त्याची त्वरीत अंमलबजावणी होत नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून आमच्या पाल्यांना अशा धोकादायक परिस्थितीत शाळेला पाठवावे लागत असल्याचे संतप्त पालकांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/592826979061702/
सदर घटना रात्री किंवा पहाटे झाली असावी. इयत्ता १ ली चा वर्ग असून या खोलीत ३४ विद्यार्थी ज्ञानार्जन करत असतात. जीर्ण वर्ग खोली बद्दल वरिष्ठांना कळवले होते. कालच इंजिनिअर सुद्धा भेट देऊन पाहणी केली होती. सदर घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसून सदर वर्गखोल्या तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे रेखा सोनकवडे (मुख्याध्यापक, वागदरी) यांनी सांगितले.
वागदरी शाळेचे शाळा गळत असल्याबद्दल पत्र आले होते. त्या अनुषंगाने पंचायत समिती बांधकाम इंजिनिअर यांना शुक्रवारी पाहणीसाठी पाठविले होते. तो अहवाल येणे बाकी आहे.लवकरच दुरूस्ती करून घेऊ, असे गटशिक्षणाधिकारी कुमुदिया शेख यांनी सांगितले.
बांधकाम विभागाचे अभियंता मल्लिनाथ मसुती यांनी या संदर्भात सांगितले की, आपण स्वतः शाळेवर पाहणीसाठी शुक्रवारी गेलो होतो. स्ट्रक्चलर आँडीट करण्यास सांगितले आहे. आज पडल्यानंतरही जाऊन पाहणी केली. छताचा खालचा काही भाग कोसळला असून अहवाल देणार आहे.
□ पालकांतून अनेक सवाल उपस्थित
छताची दुरूस्ती करण्याची गरज जिल्हा परिषदेला वाटली नाही का? पंचायत समितीने त्याचे गांभीर्य शिक्षण विभागाला सांगितले नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पालक वर्गातून आता विचारले जात आहेत. जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल केला जात असून दुर्घटनेत जीव गेल्यास जबाबदार प्रशासनास जबाबदार धरण्याची मागणी गावक-यातून होत आहे. घटनास्थळी जि प सदस्य आनंद तानवडे यांनी भेट दिली. याच बरोबर ग्रामसेवक शाळा व्यवस्थापन समिती तसेच सरपंच यांनी पंचनामा करून वर्ग खोलीच्या दुरवस्थाबद्दल वरिष्ठांना माहिती पाठवल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592771409067259/