□ बेकायदेशीर नौका; जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
पंढरपूर /सुरज सरवदे : उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील प्रशासन जागे झाले आहे. मात्र धोकादायक, बेकायदेशीरपणे चाललेल्या नौका विहारकडे दुर्लक्ष केले जात आहे. यात दुर्दैवाने जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. Dangerous boating in Pandharpur Chandrabhaga River; Disaster management is blind to loss of life
पंढरपूरमध्ये नदीतून 53 हजार क्युसेसचा विसर्ग वाहत असताना नदीमध्ये बेकायदेशीर नौका विहार केला जात आहे. एक होडीमध्ये 15-20 भाविकांना बसवले जात आहे. आज प्रांताधिकारी गजानन गुरव, जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी भीमा नदीकाठची पाहणी केली, मात्र नौका विहार करणाऱ्यांकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाविकांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे. नौका विहार करताना दुर्दैवी घटना घडल्यास त्याला कोण जवाबदार? असा प्रश्न विचारला जातोय.
चंद्रभागा नदीमध्ये नौका विहाराचा आनंद लुटण्यासाठी भाविकांची तसेच नागरिकांची गर्दी आहे. मात्र नौकाविहार करत असताना कुठल्याही प्रकारची भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी होडी चालकाकडून घेतली जात नाही. नौका विहारासाठी आलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचे लाईफ जॅकेट अथवा सुरक्षेची कुठल्याही प्रकारची तजबीज या ठिकाणी करण्यात आली नाही.
जलसंपदा विभागाचे अधिकारी म्हणतात की, पंढरपूर मध्ये बेकायदेशीर नौका विहार करत आहेत. त्यांच्याकडे परवाने नाहीत. त्यामुळे नौकाविहार करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आता धोक्यात आलेली दिसून येत आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम समोरच नौका विहार होत असेल तर नौका चालकांना अटकाव कोणी करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. बेकायदेशीररित्या नौका चालवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वाळवंटातील श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना पाण्याने वेढले आणि सायंकाळी जुना दगडी पुलावर पाणी आले. नदीची पातळी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणाच्या वरील अनेक धरणांच्या क्षेत्रात आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनी आणि वीर धरणातील पाणी पातळीत गेल्या चार दिवसात झपाट्याने वाढ झाली.
□ पंढरपुरात एकही परवानाधारक नौका चालक नाही
भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. ज्या नौका विहार करत आहेत त्या बेकायदेशीर आहे. एकही नौका चालकांकडे अधिकृत परवाना नाही. पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, असे हरसुरे ( कार्यकारी अधिकारी, जलसंपदा) यांने म्हटले आहे.
□ भीमा नदीपात्रातील विसर्ग
वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून, आज दुपारी 4.00 वाजेपर्यत वीर धरणातून नीरा नदी पात्रात 33 हजार 659 क्युसेक्स तर उजनीतून 61 हजार 600 क्सुसेक भीमा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.
सध्या पंढरपूर मध्ये भीमा नदी 54 हजार 702 क्युसेकने पाणी वाहात आहे. भीमा नदीपात्रात 1 लाख 15 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते, 1 लाख 38 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 443.600 पाणी पातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर 1 लाख 70 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 445.500 पाणी पातळी मीटर ) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते.
तर 1 लाख 97 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर ( 446.300 पाणी पातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते. वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.