• इंजिनिअर तरुणीला लग्नाचे आमिष पडले महागात
सोलापूर : जीवनसाथी डॉट कॉमवर संपर्क साधून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून २८ लाख ८ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. १५ ऑगस्ट २०२२ ते १४ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान येथील मंगळवारपेठ परिसरात घडली. Fund of Jeevansaathi.com; 28 Lakhs to a young woman of Solapur for a new app
याप्रकरणी सोलापूरच्या एका तरुणीने जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जनार्दन बसव्वा रेड्डी, बसव्वा रेड्डी (रा. विनायक नगर, सामवेडी शाळेजवळ नितवल्ली, दावणगिरी, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वरील संशयित आरोपी जनार्दन बसव्वा रेड्डी याने जीवनसाथी डॉट कॉमवर फिर्यादी तरुणीला संपर्क करून लग्न करतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून गुगल पे व आयसीआयसीआय बँक खात्याच्या माध्यमातून वेळोवेळी २८ लाख ८ हजार रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली. त्यानंतर जनार्दन याने पैसे परत न करता फिर्यादी यांच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन तसेच त्यांचे वडील व आई यांना देखील पैसे परत देतो असे सांगून विश्वास संपादन करून पैसे परत न करता फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई ताकभाते हे करीत आहे.
■ ‘शिवगंगा’ आहे सॉफ्टवेअर इंजिनियर
मूळची सोलापूरची ही तरूणी पुणे येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून २०१४ सालापासून काम करते. तिला १५ लाखांचे पॅकेज आहे. त्यावर तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोनाच्या काळात ती २०२० पासून वर्क फ्रॉम होम करत असल्याने सोलापूर येथील आपल्या राहत्या घरी आई-वडिलांकडे राहून काम करत होती.
■ पाठवली ‘रिक्वेस्ट’ अन् झाली ‘मिस्टेक’
जीवनसाथी डॉट कॉमवर जनार्दन रेड्डी नावाच्या इसमाने त्या तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर पाठवलेली रिक्वेस्ट तिने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अॅक्सेप्ट केली. जनार्दन याने ‘हाय’ म्हणून मेसेज पाठवून तुझा प्रोफाईल खूप आवडला आहे. तुला पुढच्या आठवड्यात पाहायला येणार आहे असे म्हणाला. त्यावेळी तिने विश्वास ठेवून स्वतःचा बायोडाटा पाठवून दिला व हळूहळू संपर्क वाढत पाठवलेली रिक्वेस्टची कधी मिस्टेक होऊन तिच्याकडून विविध कारणाने गोडीत बोलून २८ लाखाला फसवले हे कळले सुद्धा नाही.
☆ जनार्दनने पहिल्या पत्नीला पैशाच्या व्यवहारात फसवले
जनार्दन रेड्डी याचा यापूर्वी विवाह झाला असून, त्याने पहिल्या पत्नीसोबत पैशाचा व्यवहार करून तिला देखील फसवून तिच्याकडून घटस्फोट घेतला. तरीही त्याने दुसऱ्या विवाहाचे जीवनसाथी डॉट कॉम वरून आमिष दाखवून सोलापुरातील एका इंजिनिअर तरुणीला गंडवले. तसेच आपण सोलापूर पोलीस आयुक्त यांच्याकडे त्याला ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. तो मूळचा कर्नाटकचा असून, लवकरच त्याला आम्ही ताब्यात घेऊन पुढील चौकशी करून कारवाई करू, असे पोलीस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते यांनी ‘सुराज्य’शी बोलताना सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा
• बुडालेला पैसा काढण्यासाठी नवा जुगाड, नवा जुगार
सोलापूर : झटपट श्रीमंत होण्यासाठी हजारो रुपये गुंतवल्यानंतर लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून शेकडो सोलापूरकरांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सीसीएच ॲपवर गुन्हा दाखल झाला. त्याचा अद्याप तपास सुरू झालेला नसतानाच सोलापूरकरांना लुबाडण्यासाठी नवा ॲप पुन्हा बाजारात अवतरला आहे.
विशेष म्हणजे सीसीएच ॲपमधून ज्यांनी लाखो रुपये कमवले त्यांनी आणखी कमवण्यासाठी आणि ज्यांनी लाखो रुपये गमावले; त्यांनी ते मिळवण्यासाठी या नव्या ॲपमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. बुडालेला पैसा काढण्यासाठी सुरू केलेला हा नवा जुगाड किती दिवस टिकणार आणि हा नवा जुगार किती दिवस चालणार? हे मात्र निश्चित नसल्यामुळे सोलापूरकर पुन्हा नव्या फसवणुकीत अडकतात की काय ? असा संशय निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हजारो गुंतवल्यानंतर लाखो रुपये मिळवून देणाऱ्या सीसीएच ॲपचा धूमधडाका सोलापूर शहरात सुरू होता. गेल्या आठवड्यातच या ॲपने करोडोंचा चुना लावून रातोरात गाशा गुंडाळून पोबारा केल्यानंतर घाबराघुबरा झालेला सोलापूरकर नागरिक फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवताना दिसला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. गुन्हे शाखेने अद्याप या तपासाला हात घातलेला नाही. सोलापुरात सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे.
लाखो रुपये कमवून देणाऱ्या नव्या ॲपची चर्चा शहरात सुरू झाली आहे. त्याचवेळी हा ॲप किती दिवस टिकणार आणि किती दिवस गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळणार? हे निश्चित नसल्यामुळे दुसऱ्या बाजूला गंडवले जाण्याची भीतीसुध्दा निर्माण झाली आहे.
■ सुरुवातीला पैसे मिळतात हा समज
सीसीएच ॲपचा धुमाकूळ साधारण सहा महिन्यांपासून सुरू होता. म्हणजेच सहा सीसीएचमधून परतावा मिळत होता. त्यावर अनेकजण श्रीमंत झाले. त्यानंतर सीसीएच शटडाऊन झाले. आता नव्याने आलेल्या अॅपमधूनही सुरुवातीला पैसे मिळतील. सुरुवातीलाच फसवणूक होणार नाही; म्हणून नव्या ॲपमध्ये सोलापूरकर डोळे झाकून गुंतवणूक करताना दिसत आहेत..
■ तीच फाईल, तशीच स्टाईल
सीसीएच अॅप गुगल प्लेस्टोरवरून इन्स्टॉल केल्यानंतर रुपयांमधील गुंतवणुकीला डॉलरमध्ये परतावा मिळत होता. अगदी सीसीएच अॅपची जी स्टाईल होती; त्याच स्टाईलचे नवे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले असून त्याचीच सध्या सोलापूरमध्ये चलती आहे. सीसीएचचा गंडा माहीत असतानाही या नव्या अॅपमध्ये गुंतवणुकीचा फंडा जोरात सुरू झाला आहे.
■ कशासाठी.. ? जिथे हरवले… तिथेच शोधण्यासाठी…
कोणी कर्ज काढून, कोणी घरातले दागदागिने विकून, कोणी जागा- घर गहाण ठेवून पैसा उभा केला आणि सीसीएचमध्ये गुंतवला. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी गुंतवणूक केली; विशेषत: त्यांचीच फसवणूक झाली. त्यांनी जे सीसीएचमध्ये हरवले आहे; ते शोधण्यासाठी तेच लोक या नव्या ॲपमध्ये उतरले आहेत. जिथे हरवले; तिथेच शोधायचे ही या लोकांची मानसिकता आहे.
□ घोटाळा होण्यापूर्वीच ठोकावा टाळा
येणाऱ्या काळामध्ये सीसीएचप्रमाणे मोठा घोटाळा होऊ शकतो. त्या आधीच लोकांनी सतर्क झाले पाहिजे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपल्या कष्टाचा पैसा घातला नाही पाहिजे. सायबर विभागाने व पोलीस प्रशासनाने याचा तपास करून गुन्हेगारांचा शोध घेतला पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा अशा प्रकारचा गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस यंत्रणेने पावले उचलली पाहिजेत.
– राज सलगर (सामाजिक कार्यकर्ते)