□ अनेकांचे देव पाण्यात, इच्छुक गुंतले वशिला लावण्यात
• सोलापूर : एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातल्या त्यात सोलापुरातून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. Soon the second cabinet will be expanded, who will get the minister post in Solapur? Deshmukh Raut Mohite Patil
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मंत्रिपद नव्हते. शिंदे फडणवीस यांच्या पहिल्या विस्तारातही सोलापूरला मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती, त्यामुळे आता तरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आत्तापर्यंत राज्यात फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती, त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. पण हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मंत्रिपदासाठी देव पाण्यात
मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे. तो कधी होईल हे सांगत येत नाही, त्यात भाजप व शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण किती जणांना मंत्रिपद मिळणार? तसेच मंत्रिपदावरून दोन्ही गटात प्रचंड नाराजी आहे, अशातच फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 25) लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे येणारा काळच सांगेल.
□ सोलापुरातून देशमुख की मोहिते-पाटील ?
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपचे ७ (अपक्ष मिळून) आमदार आहेत. त्यामुळे एक मंत्रिपद मिळावे, अशी सर्वांची इच्छा आहे. कॅबिनेट मंत्रिपद सोलापूरच्या वाट्याला आल्यास ज्येष्ठ आमदार म्हणून आ. सुभाष देशमुख यांची वर्णी लागेल, अशी शक्यता आहे. दुसरीकडे राज्यमंत्रिपद देण्याचे ठरल्यास आ. विजयकुमार देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि राजेंद्र राऊत यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत ज्या-ज्यावेळी भाजपचे सरकार आले आहेत, त्यावेळी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली होती, आताही तसेच होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
□ बच्चू कडूंची नाराजी दूर होणार का ?
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचे सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसे घडले नाही, त्यामुळे त्यांनी अनेकदा जाहीररीत्या नाराजीही व्यक्त केली होती.
पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.