□ नितीन गडकरींनी पुन्हा ‘टोला’ लगावला
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील परखड बोलणारे तसेच कार्यक्षम मंत्री म्हणून लौकिक कमावलेले भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुन्हा सडेतोड विधान करून आपल्या हातातील भाला फेकला. त्यांच्या एका विधानाने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. गडकरी यांनी कुणाच्या दिशेने ही भालाफेक केली, मोदी-शहा यांच्या दिशेने तरी नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे. Delhi’s ‘water’ is not good, only Maharashtra can afford it Nagpur Pune flying bus Nitin Gadkari
दिल्लीतील राजकारणासंदर्भात आपल्या मनात साठलेल्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली. मी राजकारणात गेल्यानंतर दिल्लीला गेलो. आजपर्यंत अनेक लोकांना भेटलो. खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली. छोटी वाटणारी माणसे उत्तुंग होती. असे अनेक अनुभव घेतले. पण दिल्लीचे ‘पाणी’ चांगले नाही. आपला महाराष्ट्रच चांगला आहे”, असे गडकरी यांनी म्हणाले.
मुंबईच्या आयआयटीमध्ये शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे गडकरी यांचा ‘खुजी लोकं या वक्तव्याचा रोख नेमका रोख कुणाकडे? याविषयी तर्क-वितर्क काढले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी गडकरी यांची भाजपच्या संसदीय समितीमधून गच्छंती झाली होती. तेव्हापासून त्यांना भाजप पक्षसंघटनेत बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची अलीकडच्या काळातील त्यांची अनेक वक्तव्ये ही एकप्रकारचा गर्भित इशारा असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकारणाविषयीचे त्यांची विधाने चर्चेची ठरू लागली आहेत. गडकरी यांनी आगामी लोकसभा निवडणूक भरघोस मतांनी जिंकणार असल्याचा दावाही केला. मी माझ्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी जिंकलो, पुढच्या वेळेस पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, असा विश्वास व्यक्त केला.
प्रशासकीय काम करताना अहंकारामुळे अनेकदा मॅनेजमेंट लेव्हलला अडचणी निर्माण होतात. संबंध कसे असावे हा सगळीकडेच महत्त्वाचा विषय आहे, आपण आयात काय करतो ते बघा. त्याला पर्याय शोधा, त्यावर रिसर्च करा त्याचा खूप फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले. मला भारतातून पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचे आहे. हा एक अवघड संकल्प असल्याचेही ते म्हणाले.
□ नागपूर ते पुणे प्रवास ८ तासांत होणार शक्य; गडकरींची मोठी घोषणा
नागपूर : पुणे – नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी नवा मार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला जोडण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. एक्स्प्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला येणे-जाणे आठ तासांत शक्य होईल, असे गडकरी यांनी ट्वीट करून सांगितले. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नागपूर ते पुणे प्रवास आता केवळ आठ तासांत शक्य होणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाला एक्सेस ग्रीन एक्स्प्रेसवेनी जोडण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गडकरी यांनी सांगितले आहे की, सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला औरंगाबादजवळ नवीन प्रस्तावित पुणे-औरंगाबाद एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस-वेनी जोडण्यात येईल. गडकरींनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाकडून या मार्गाचे काम करण्यात येईल. यामुळे पुणे – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर – छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे.
□ चार जिल्ह्यांतून जाणार जलदगती मार्ग
औरंगाबाद- अहमदनगर- पुणे महामार्गावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद पुणे या शहरांना जोडणारा स्वतंत्र एक्स्प्रेस वे उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे हा २६८ किमी लांबीचा असणार आहे. पुणे, अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद अशा चार जिल्ह्यांतून हा जलदगती महामार्ग जाणार आहे. सहा पदरी महामार्ग औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेस वे हा महामार्ग पुण्यातील पुणे-बंगळुरू महामार्ग म्हणजे प्रस्तावित रिंग रोड येथून सुरू होईल. तर, औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाजवळ याचा शेवट असणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.
□ हवेत चालणारी डबल डेकर बस,
दोनशे प्रवासी घेऊन उडणार
मुंबई : हवेत उडणारी बस, रोपवे कार, टोलनाके कायमचे बंद, यासारख्या ‘उडत्या’ घोषणांनी कायम चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईकरांना आणखी एक स्वप्न दाखवले आहे. हवेत चालणारी डबल डेकर बस मुंबईत हवीये, त्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत, असे श्री. गडकरी म्हणाले.
पवई ते नरिमन पॉईंट हवेतून प्रवास करण्याचे स्वप्नरंजन गडकरींनी मुंबईकरांसाठी केले. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी जबरदस्त भाषण केले.
□ नितीन गडकरी काय म्हणाले?
मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिकसिटीचा वापर व्हावा. बंगळुरुत इतका ट्रैफिक जाम आहे, इतके प्रदूषण आहे की, मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झालेय, हवेत चालणारी डबल डेकर बस, मुंबईत अशीच हवीये, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. दोनशे लोक वरच्या वर हवेतून जाणार, असे गडकरी सांगत होते.
पवईतून डोंगराच्या वरुन निघून नरीमन पॉईंटला वरच्या वर जाणार, तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल, वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
देशभर १६५ रोप वे आम्ही बांधत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रस्ताव आहेत. पुणे शहराच्या वाहतूक कोंडीचा पीएमआरडीने अभ्यास करावा. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. १२० ते १५० लोक त्यातून प्रवास करु शकतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र बसून चर्चा करावी. निधीची चिंता नाही. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले होते.
खरे तर काळाच्या पुढची पावले ओळखून काम करणारे, जलदगती निर्णय येणारे द्रष्टे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, त्यांच्या बऱ्याचशा ‘लोकप्रिय’ घोषणा केवळ ‘हवेतच’ विरणार की काय, अशी भीती व्यक्त होते.
□ पुण्यासाठीही घोषणा
पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय काही महिन्यांपूर्वी दिला होता. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, असे नितीन गडकरी यांनी सांगितले होते.