सोलापूर : तक्रारी अर्जावरून पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच तरुणाने दगड खाणीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. Solapur. While investigation by the police is going on, youth commits suicide, brother-in-law murder attempt, forced labor court
नवनाथ शंकर पवार (वय ३२, रा. गणपती घाट, मंठाळकर वस्ती, तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नवनाथ पवार हे गणपती घाट परिसरात राहत होता. पोकलेन मालक संजय लिंबोळे यांच्या चालकाने पोकलेनचा पार्ट नवनाथ याला ठेवण्यासाठी दिला होता. तो त्याने तळेहिप्परगा येथील दगड खाणीजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले होते. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नवनाथ याला सोबत घेऊन दगड खाणीजवळ गेले होते.
त्यावेळी तेथे पार्ट सापडला नाही. तेव्हा नवनाथ याने अचानक तेथून पळत जाऊन दगड खाणीत असलेल्या पाण्यामध्ये उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु नवनाथ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टराने घोषित केले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता.4) रात्री दहाच्या सुमाराला त्याचा मृत्यू झाला.
याबाबत सोलापूर तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे म्हणाले, पवारला चोरीच्या संशयावरून चौकशीला बोलावले होते. घटनास्थळी नेऊन पाहणी करताना त्याने अचानक खाणीत उडी मारल्याचे सांगितले. चोरीच्या घटनास्थळी नेऊन पाहणी करताना पवार याने खाणीत उडी मारली. जखमीवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व आई असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दीरास १० वर्षे सक्तमजुरी
सोलापूर : भावजयीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दीर बाळू लक्ष्मीपती भंडारी (वय ३०, रा. नीलमनगर, राघवेंद्र नगरजवळ) यास १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी ठोठावली.
शोभा नरेश भंडारी (वय ३५, रा. अ विभाग विडी घरकूल, कुंभारी, ता. द सोलापूर) ही विडी कामगार असून, ती पती व मुलांसह राहाते. आरोपी बाळू हा तिचा दीर असून, तो त्यांच्याकडे येत असे. त्यावेळी आरोपीचे एका मुलीशी संबंध होते. त्यास फिर्यादी व घरातील सर्वजण समजावून सांगत होते की, आपण तुला आपल्या समाजातील मुलगी करुन देऊ, त्यावेळी आरोपी त्याच मुलीशी लग्न करावयाचे म्हणून फिर्यादी व घरातील सर्वांना भांडत होता.
1 एप्रिल २०१८ रोजी फिर्यादी घरात होती व तिचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला असताना आरोपी हा घरी आला. तो, तुम्ही मला माझ्या आवडत्या मुलीशी लग्न का करु देत नाही, तुम्हाला मी दाखवतो असे म्हणू लागला. त्यावेळी फिर्यादी त्याला तुझे भाऊ आल्यावर तू ये. मग आपण सर्वजण बोलू असे सांगितले. त्यावेळी आरोपीने तुझ्यामुळेच सगळे होत आहे, मी तुझ्यामुळेच सगळे होत आहे, मी तुला सोडणार नाही, असे म्हणून त्याने ब्लेडने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला, त्यात ती जखमी झाली, तरीही तो ऐकला नाही, फिर्यादीला ढकलून लाथाबुक्क्याने मारहाण करुन पळून गेला.
त्यानंतर शेजारी निर्मला करनकोट या त्यांचा गोंधळ ऐकून घरात आल्या व त्यांनी फिर्यादीला उचलून पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी तिला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार शीतल साळवी यांनी काम पाहिले.
यात सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी आरोपीने ब्लेड विकत दुकानदार, फिर्यादी व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपी भंडारी यास १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची सर्व रक्कम फिर्यादीस नुकसान भरपाईपोटी देण्याचा आदेश दिला.
यात सरकारतर्फे ॲड. एम. बी. गुंडे व ॲड. माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. एम. एस. कुरापाटी यांनी काम पाहिले.