□ शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात पहिली मोठी निवडणूक
सोलापूर : राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. Solapur. The program for the general election of 189 Gram Panchayats has been announced
शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात पहिली मोठी निवडणूक असणार आहे. माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याने आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अक्कलकोट तालुक्यातील 20, बार्शी 22, करमाळा 30, माढा 8, माळशिरस 35, मंगळवेढा 18, मोहोळ 10, उत्तर सोलापूर 12, पंढरपूर 11, सांगोला 6 आणि दक्षिण सोलापूर 17 अशा एकूण 189 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांकरिता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत).
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत.