सोलापूर : ‘कुटं बी हुडीक मुन्ना महाडीक’ या कोल्हापूरच्या मातीतल्या घोषणेने कोल्हापूरचे राजकारण गाजवणारे धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे राज्यसभेच्या निवडणुकीत चमत्कारीक कामगिरी करून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय झाले आहेत. तीन वेळा उत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार मिळवणारे खा. धनंजय महाडिक यांनी भीमा कारखान्याच्या निवडणुकीत विरोध करायला आलेल्या विरोधकांना चारी मुंड्या चित करायचा संकल्प केला आहे. Munna Dhananjaya Mahadik bhima sugar factory election
भीमा कारखान्याच्या निवडणुकीत ‘ठरलंय नक्की… हॅट्ट्रीक पक्की’ ची घोषणा देत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पाय रोवण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नाही तर माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील यांना यापुढे प्रत्येक निवडणुकीत आडवे येत जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगत दंड थोपटले आहेत. खा. महाडिक हेच ‘भीमा’चा सिकंदर असतील, असा दावा, त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
परिसरात हरित क्रांती करण्यासाठी भीमराव महाडिक यांनी जवळपास 50 वर्षांपूर्वी भीमा कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर जवळपास 25 वर्षे कारखाना परिचारक आणि पाटील गटाकडे होता. या काळात त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी विस्तारासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली नाहीत. याऊलट आपले वैयक्तिक कारखाने व्यवस्थित चालावेत त्यांना ऊस मिळावा म्हणून त्यांनी भीमा कारखान्याकडे दुर्लक्ष केले. स्वतःची कारखाने खासगी करून ते आज सहकार बचाओची घोषणा देतात, ही बाबच हास्यास्पद आहे.
● गंभीर आरोपांवर महाडिकांची खंबीर उत्तरे
– विरोधकांचे आरोप : ‘सहकार बचाओ’साठी निवडणूक
उत्तर : विरोधी गटातील माजी आमदार राजन पाटील यांचा लोकनेते कारखाना तर उमेश परिचारक यांचा युटोपियन कारखाना खासगी आहे. स्वतः खासगी कारखाने चालवणारे आम्हाला सहकाराच्या गोष्टी शिकवतात हे सभासदांना कळतं.
– विरोधकांचे आरोप : कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार
उत्तर ः विरोधकांनी आरोप केले 600 कोटींचा अपहार केला आहे. पुरावे मागताच पुढच्या सभेत 400 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला. आम्ही पुरावा मागण्यावर ठाम राहताच पुढे हा आरोप बंद झाला. कारखान्याचे चेअरमन पेट्रोल, डिझेल पासून सर्व खर्च कारखान्याच्या हिशोबात लावत असतात. एक कोटी ते तीन कोटी खर्च जनरली विविध चेअरमन दाखवतात. आम्ही मात्र साधे 10 रूपयांचे व्हाऊचर देखील केले नाही. कारखान्यावर पार्ट्यांसाठी रेस्टहाऊस असतात आम्ही तो प्रकार ठेवला नाही. याचे विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे.
– विरोधकांचे आरोप ः लग्नासाठी आणि पेढे वाटण्यासाठी कारखान्याचे पैसे
उत्तर ः महाडिक परिवार राजकारणापूर्वीपासूनच व्यावसायात मोठे प्रस्थ निर्माण करणारा परिवार आहे. अशा किरकोळ खर्चासाठी कारखान्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. स्वतःचे 4/5 पेट्रोल पंप असल्याने आम्हाला पेट्रोल डिझेल खर्च कारखान्यात लावण्याची आवश्यकता नाही. असे क्षुल्लक आरोप करून विरोधकांनी विरोधाची पातळी ओलांडली आहे.
□ ओपन चॅलेज
भीमा कारखान्याच्या वजन काट्यामध्ये 1 किलोचा जरी फरक पडला तर 1 लाख रुपयांचे बक्षीस चेअरमन खा. धनंजय महाडिक यांनी जाहीर केले आहे तर त्याचबरोबर चालू गळीत हंगामात पहिली उचल 2200 रुपये तर अंतिम दर 2600 रुपये जाहीर केला आहे. विरोधकांनी वजनकाटा आणि दराबाबत आपल्याशी स्पर्धा करावी, असे ओपन चॅलेज खा. महाडिक यांनी दिले.
● सोलापूरच्या विमानसेवेत लक्ष्य घालणार
कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्यात आपणच पुढाकार घेऊन सेवा सुरू केली. त्यानंतर अनेकांनी येऊन तिथे फोटोसेशन केले. कारखाना निवडणुकीनंतर सोलापूरच्या विमानसेवेकडे लक्ष घालणार आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर सोलापुरात देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे खा. धनंजय महाडीक यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कोल्हापूरसारखी सुबत्ता आणू
कोल्हापुरातील शेतकरी सधन आहे. तिथे गावपातळीवर सभास्थळे आहेत. दोन-दोन तीन-तीन मजली कार्यालये आहेत. त्या तुलनेत सोलापुरात झाडाखाली सभा घ्यावी लागते, हे दुर्देव आहे. रस्त्यापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मूलभूत विकासासाठी सोलापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही खा. महाडीक यांनी सांगितले.
● भाजप – राष्ट्रवादी विरुध्द भाजप – राष्ट्रवादी
भीमा कारखान्याची निवडणूक स्थानिक पातळीवरची असली तरी त्याचा पक्षीय पातळीवर विचार केल्यास ही निवडणूक भाजप – राष्ट्रवादी विरुध्द भाजप – राष्ट्रवादी अशीच रंगली आहे. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेश पाटील, रमेश बारसकर,मानाजी माने हे नेते आहेत. दुसरीकडे माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे तर आणि परिचारक हे भाजपचे आहेत.
● महाडिक परिवाराची नेस्ट जनरेशन मैदानात
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रंगत आता वाढू लागली आहे. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांच्या माध्यमातून महाडिक कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. ही निवडणुक येत्या रविवारी (ता. १३ नोव्हेंबर) होणार आहे. त्यासाठी खासदार महाडीक त्यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडीचा प्रचार करीत आहेत.
महाडीक यांच्या बरोबरच त्यांचे पुत्र विश्वराज हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून निमित्त विश्वराज यांची राजकीय एंट्री असणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विश्वराज देखील या निवडणुकीत त्यांच्या विकास आघाडीचा विजय व्हावा यासाठी सभासदांचे गाठीभेटी घेतायात. विश्वराज देखील निवडणुकीच्या व्यूहरचनेत पुढाकार घेताना दिसत आहे.
□ महाडिक गटाचा दावा
* कारखाना अडचणीत होता तरीपण, ऊस बिले दिली
* कामगारांच्या देय रक्कम थकल्या, पण लवकरच त्या देऊ
* कारखाना विस्तारीकरणाच्या खर्चाचा बोजा शेतकर्यांवर न पडू देणारा राज्यातील पहिला कारखाना
* विस्तारण आणि उपपदार्थ निमिर्तीचे प्रकल्प हाती घेतल्याने कारखान्याला पर्यायाने सभासदांना येणार अच्छे दिन
* कारखान्याची तब्बल 18 कोटींची मुद्दामहून भिजवली साखर
* भीमा कारखान्यांवरच विरोधकांनी लोकनेते कारखाना उभा केला
● गावोगावचा दौरा
मोहोळ तालुक्यातील श्री नागनाथ मंदिर, वडवळ येथे भीमा शेतकरी विकास आघाडीने प्रचार शुभारंभ केला. त्यानंतर पुळूज, बेगमपूर, सोहाळे, कुरुल, शारदानगर(पुळूज),अंकोली, विरवडे, इंचगाव, पाटकुल,तुंगत,टाकळी सिकंदर,फुलचिंचोली, शेजबाभूळगाव, वरकुटे, आंबेचिंचोली, पळुजवाडी, कोन्हेरी, ढोक बाबुळगाव, नजीकपिंपरी, पोखरापूर, मगरवाडी, येवती, पेनूर, तारापूर, आडेगाव, कातेवाडी, गोटेवाडी, मुंडेवाडी, नांदगाव, सौन्दने, तांबोळे, औंडी, कोथाळे, विटे, शंकरगाव, वडदेगाव, नळी, खरसोळी, बोरगाव, बठाण आदी गावात प्रचार सभा आणि शेतकर्यांशी संवाद साधण्यात आला.
□ भीमा कारखाना ऍट ए ग्लान्स
भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर
‘भीमा शेतकरी विकास आघाडी’ विरूद्ध भीमा बचाव पॅनल निवडणूक
13 नोव्हेंबर रोजी मतदान
14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी
19 हजार 48 मतदार