मुंबई : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी एक झटका दिला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची एकूण संख्या 13 झाली आहे. किर्तीकर हे जुने शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. Biggest blow to Uddhav Thackeray; MP Gajanan Kirtikar joins Shinde faction
ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यामुळे गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादी – काँग्रेससोबत युती नको म्हणून किर्तीकर नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तसेच किर्तीकर आजारी असताना शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली होती.
गजानन किर्तीकर हे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंसोबत गेल्याने महत्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि काही दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी खासदार गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले होते. तर, शिवसेना आणि भाजप हीच खरी युती, असे परखड मत त्यांनी मांडले होते. ते उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात येणार अशी चर्चा रंगली होती.
गजानन कीर्तिकर यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ खासदार मानले यायचे. पण आता त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या खासदरांची संख्या 13 वर पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आणखी एका खासदाराने पक्ष सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे लोकसभेचे 12 खासदार आधी शिंदे गटात सामील झाले आहेत. यात राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. यात गजानन किर्तीकर यांची भर पडली आहे.
□ आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमधून हिंगोलीत पोहोचली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.