□ सराव सामने घेण्यासाठी असोसिएशनला मैदान निशुल्क देणार
□ दौरा असल्यास १९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन
सोलापूर : शहरातील पार्क मैदानावरील स्मार्ट सिटी निधीच्या तयार होत असलेल्या खो खो, कबड्डी व व्हॉलिबॉल मैदानावार सराव करणाऱ्या प्रती खेळाडूंना नोंदणी शुल्क रुपये १०० आकारण्याचा निर्णय महापालिका स्टेडियम समितीने घेतला आहे. सराव सामने घेण्यासाठी असोसिएशनला मैदान निशुल्क देणार, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. Solapur. The Municipal Corporation will now charge Rs.100 to the players for Indira Gandhi Park Stadium
दरम्यान, भाडे आकारणी करू नये यासाठी जिल्हा क्रीडा महासंघ आणि संबंधीत जिल्हा संघटनेने महापालिकेस निवेदन दिले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान, महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप आणि सर्व शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजीमलंग नदाफ उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी कोणतीही भाडे आकारणी करू नये, ही मागणी केली. परंतु चर्चेनंतर त्यांनी यास संमती दिली. तसेच जिल्हा असोसिएशनच्या निवड स्पर्धेसही मैदाने विनाशुल्क वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु वाढदिवसाच्या स्पर्धेस प्रतिदिन १ हजार रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या इंदिरा गांधी पार्क स्टेडियम मधील टेबल टेनिस असोसिएशनसह खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल व अन्य असोसिएशन यांनी कोणते सामने भरविल्यास त्यांच्याकडून दर आकारले जाणार नाही.
□ टेबल टेनिसला वार्षिक एक हजार रुपये
टेबल टेनिसमध्ये विद्यार्थी यांना वार्षिक, सहामाही व मासिक असे अनुक्रमे १०००, ५०० व १०० असे तर प्रौढ इतरांना २०००,१०००, २०० असे शुल्क ठरविण्यात आले आहे. तर राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना विनाशुल्क सराव करण्यास परवानगी दिली आहे, असेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.
□ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा 19 नोव्हेंबरला दौरा असल्यास स्टेडियमचे उद्घाटन !
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सोलापूर दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पार्क स्टेडियम येथे नूतनीकरणासह तयार करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीचे मैदान आणि महापालिकेतील सुशोभीकरण करण्यात आलेली इंद्रभवनची इमारत याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
या संदर्भात यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांना पत्र देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून पत्र देण्यात आले आहे. दौरा असेल तर हे उद्घाटन पार पाडण्यात येऊन स्टेडियम सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.