पंढरपूर – नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस विविध मार्गाने एकूण ३ कोटी २० लाख ५९ हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी २२ लाख ७६ हजार रूपयाची वाढ झाली आहे. दरम्यान यंदा वारीकाळात ३ लाख १२ हजार भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेतले. Pandharpur. Vitthal Rukmini Mandir Samiti’s income of Rs 3 Crores during Kartiki Yatra
यंदा कार्तिकी वारीमध्ये तुलनेने कमी गर्दी असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. मात्र तरीही भाविकांनी भरभरून दान श्री विठ्ठल रूक्मिणीच्या चरणावर अर्पण केले. विठुरायाला आज देखील गरीबांचा देव मानले जाते. कारण येथे येणारा बहुतांश वर्ग सर्वसामान्य व शेतकरी असतो. यामुळे गर्दी बाबत हे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असले तरी उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात मागे असणारे देवस्थान आहे. मात्र वारकर्यांच्या श्रध्देला तोड नसते. यामुळेच एकादशी दिवशी तब्बल अठरा ते वीस तास दर्शन रांगेत थांबून ३९ हजार ८७१ भाविकांनी विठ्ठलाचे चरण दर्शन घेतले. तर ४३ हजार ८१० जणांनी विठ्ठल रूक्मिणीचे मुखदर्शन घेतले.
दरम्यान यंदा विठ्ठलाच्या चरणावर २४ लाख ७४ हजार रूपये तर रूक्मिणीच्या चरणावर ९ लाख ४१ हजार रूपये वारकर्यांनी अर्पण केले. मागील वर्षी कार्तिकी यात्रा झाली परंतु कोरोनामुळे केवळ मुखदर्शन सुरू होते. यामुळे मागील वर्षी चरणावरील दक्षिणा अर्पण करण्यात आली नाही. विविध देणगी पावतीव्दारे यंदा १ कोटी ६ लाखाच दान तर मागील वर्षी ५९ लाख ७३ हजार रूपये देणग्या प्राप्त झाल्या होत्या.
प्रसादाच्या लाडू विक्रीतून यंदा ३९ लाख ४६ हजार तर राजगिरा लाडू मधून ५ लाख २१ हजार रूपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षी लाडू विक्री बंद होती. श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवास व्दारे समितीस १७ लाख २७ हजार उत्पन्न मिळाले असून मागील वर्षी हा आकडा १५ लाख रूपये होता. ऑनलाईन देणगी यंदा १७ लाख रूपयांची प्राप्त झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ८ लाखांची वाढ झाली आहे. देवाला १२ लाख रूपयांचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने तर १ लाखाचे चांदीचे दागिने प्राप्त झाले आहेत.
मात्र या वर्षी हुंडी पेटीमधील उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत २० लाखांनी घटले आहे. यंदा हुंडी पेटीतून ४८ लाख ९१ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. यासह परिवार देवता समोर ही भाविकांनी मागील वर्षीच्या तुलनेत १३ लाख रूपये कमी दान दिले आहे. मागील वर्षी ३२ लाख तर यंदा १९ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. फोटो विक्री व मोबाईल लॉकरचे उत्पन्न देखील घटले असल्याचे चित्र आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मोहोळमध्ये टेम्पो – ट्रव्हलरचा अपघात, तीन ठार तर दोन जखमी
सोलापूर : टेम्पो ट्रॅव्हलरने कारला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावरील पेनुर हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर काल शुक्रवारी (ता. 11) रात्री दहा वाजता झाला आहे.
प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५ वर्षे), सुरज दिलीप कदम (वय २५ वर्षे), ऋषिकेश रामकृष्ण साखरे (वय २५ वर्षे तिघेही रा. विजापुर गल्ली, पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत, तर दत्तात्रेय श्रीमंत कोकाटे ( रा तांबोळे) व दत्तात्रेय बाळासाहेब देवकते ( रा कोन्हेरी) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
काल मध्यरात्री पेनुर हद्दीत गजानन पेट्रोल पंपाचे जवळ हा अपघात झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथे सलुनचा व्यवसाय करणारे आहेत. दत्ताराम नारायण जाधव हे पंढरपूर येथे मुलगी व जावई यांना भेटण्यासाठी आले होते.
दरम्यान शुक्रवारी (दि. ११ ) दुपारी त्यांचा जावई प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५) व त्याचे मित्र सुरज दिलीप कदम (वय २५ ) व ऋषीकेश रामकृष्ण साखरे (वय २५ रा तिघे पंढरपूर) असे मिळून कारमधून सोलापूर येथे शोरूमला जावून येतो म्हणून गेले होते. सोलापूरहून परत पंढरपूरकडे येत असता हा अपघात झाला.
मोहोळ ते पंढरपूर रोडवर विरूध्द दिशेने जाणारे टॅम्पो ट्रॅव्हलने धडक दिली असून त्यात कार मधील तिन इसमांना मार लागून ते गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले . या आपघातातदोन्ही वाहनाचे मिळून अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले.
दत्ताराम नारायण जाधव (वय ६५ धंदा सलुन व्यवसाय रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार टेम्पो चालकावरती गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास आपघात पथकाचे सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.
□ बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड
सोलापूर येथील वकिलांच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड हे अध्यक्ष झाले आहेत. परंतु, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदारपदी विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना यश मिळाले. ॲड. गायकवाड यांच्या पॅनेलमधील सहसचिव पदाच्या उमेदवार ॲड. अनिता रणशृंगारे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. विधी विकास पॅनेलचे प्रमुख ॲड. राजेंद्र फताटे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे.