☆ आदित्य ठाकरेंनी केला आ. शहाजीबापूंचा राजकीय बंदोबस्त ?
अकलूज / डी एस गायकवाड
राजकीय बुद्धिबळाच्या खेळात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक डाव टाकत सांगोला तालुका दौरा करून आमदार शहाजीबापू पाटील यांचा देशमुख कुटुंबीयांना भेटून केलेल्या बंदोबस्ताची चाल भविष्यातील राजकारणात परिणामकारक ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात घर करून राहिली आहे. Tell us about the experiment of Deshmukh Astra by Aditya Thackeray to oust MLA Shahjibapu
सांगोला तालुक्याच्या राजकारणात नेहमीच शेकापचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. १९९५ आणि गतकाळातील निवडणुकीचा अपवाद वगळला तर नेहमीच या तालुक्यावर शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. अगदी पूर्वीपासून या तालुक्यात शेकापची ताकद मोठी समजली जाते. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी या तालुक्याचे नाव आपल्या कर्तुत्वातून आणि आदर्श वर्तणुकीतून अगदी देशभर उंचावले. आजही तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते स्वर्गीय देशमुख यांच्या मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना राजकारण समाजकारण करताना दिसतात.
अशा अवस्थेत सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील बंडाळीत सहभागी होत काय झाडी.. काय डोंगर.. संमद ओके मध्ये.. असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात सेलिब्रिटी म्हणून नाव कमावले. यावरच ते थांबले नाहीत तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत सभा गाजविल्या.
यावर राष्ट्रवादी, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया देखील ऐकावयास मिळाल्या. याच टीका टिप्पण्या आता शहाजीबापूंना भोवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. याकामी आमदार शहाजीबापू पाटील यांचा राजकीय बंदोबस्त करण्यासाठी शिवसेना सरसावल्याचे दिसत आहे.
नुकताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगोला तालुका दौरा करीत या दौऱ्यात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेताना देशमुख कुटुंबीयांशी त्यांनी जवळीक साधत संवाद साधला. आमदार शहाजीबापूंचा पाडाव करायचा असेल तर राष्ट्रवादीसोबतच आहे पण त्यापुढे जाऊन आदित्य ठाकरे यांनी सांगोला तालुक्यात वर्चस्व असणाऱ्या शेकापला खुणावले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा भविष्यातील अचूक बंदोबस्त केला असल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शेकाप पक्षाच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांचा गेम ओव्हर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळाल्याने गत विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या चिन्हावर शहाजीबापु पाटील यांनी अगदी काटावर का असेना आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीची मते निर्णायक आहेत पण आ. बापूंनी पवारांवर केलेल्या टिकेमुळे राष्ट्रवादी भविष्यातील विधानसभा निवडणुकीत शहाजीबापूंना साथ देईल, असे वातावरण नाही हे जाणुनच कोणत्या का पध्द्तीने असेना शहाजीबापू हे पडले पाहिजेत, याच उद्देशाने आदित्य ठाकरे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेत ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.
देशमुख अस्त्राचा वापर करीत आदित्य ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना जेरीस आणण्याचा डाव टाकला असून यामुळे भविष्यात बापूंना सांगोल्याचे रणांगण जिंकण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ भीमा साखर कारखाना : निवडणुकीचा प्रचार पोहचला नको त्या पातळीवर
– पाटलांच्या पोरांना लग्नाअगोदर पोरं : राजन पाटील
– पाटील म्हणून घ्यायची लाज वाटते : उमेश पाटील
सोलापूर : मोहोळ – पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची. एका बाजूला आहे सत्ताधारी कोल्हापूरचा महाडिक गट; दुसऱ्या बाजूला आहे विरोधी अनगरचा राजन पाटील व पंढरपूरचा परिचारक गट. दोन्ही बाजूने प्रचारात उतरली आहे दोन्ही गटातील नेत्यांची पुढची पिढी.
या पुढच्या पिढीतील पोरांवरूनच पोरांच्या पालकांनी नको ती वक्तव्ये केल्यामुळे निवडणुकीचा प्रचार नको त्या पातळीवर पोहचला आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचेच प्रवक्ते व मोहोळमधील माजी जि.प. सदस्य उमेश पाटील यांनी जोरदार टीका केल्यामुळे निवडणूक प्रचाराला व्यक्तिगत हेवेदाव्यांचा रंग आला आहे.
‘गेल्या आठ दिवसांपासून फक्त आमच्या कुटुंबीयांवर टीका केली जात आहे. दुसरी काही भानगडच नाही. प्रशांतमालक (परिचारक) तुम्ही आज आला आहात. निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटील यांच्या कुटुंबीयांची आहे, हे कळायला मार्गच नाही. आम्ही पाटील आहे. आमच्या पोरांना बाळं म्हणत आहेत. अरं आम्ही पाटील आहोत. त्यांना माहितीच नाही की, पाटलांच्या पोरांनाही लग्नाच्या आधी | एवढी बाळं असतात बेट्या…. तुझ्याएवढी….. आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे, ‘ हे विधान आहे तब्बल तीनवेळा आमदार म्हणून विधानसभेत गेलेले राजन पाटील यांचे. तेसुध्दा जाहीर सभेत केलेले. याच विधानावरून आता विरोधकांवर टीका करणारे माजी आ. राजन पाटील स्वतः टीकेचे धनी झाले आहेत.
शुक्रवारी (ता. 11) भीमा कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. एका जाहीर प्रचार सभेत भीमा कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांच्यावर तोंडसुख घेताना माजी आ. राजन पाटील यांनी हे विधान केले आहे. दरम्यान राजन पाटील यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. राजन पाटील यांच्यासारख्या जुन्या-जाणत्या नेत्यांकडून केलेल्या बेताल वक्तव्याचे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“स्वत:च्या पोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी अभिमानाने सांगताना ‘आमच्या पोरांना बाळं म्हणत आहेत… तुम्ही आमच्या पोरांना भीती घालताय ? अहो, वयाच्या सतराव्या वर्षी ३०२ ची कलमं भोगणारी आमची पोरं आहेत… तुम्ही आम्हाला काय भीती घालताय…?”
राजन पाटील
(राष्ट्रवादीचे माजी आमदार )
आमच्या नेत्याची दोन पोरं प्रचारात आहेत. त्यांनी भाषणात सांगितलं की, आमच्या पोरांना लग्नाच्या अगोदरच पोरं झालेली आहेत. एवढंच नाहीं तर आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे, असंही ते म्हणाले. लग्नाच्या अगोदर स्वतःच्या पोरांना आधीच पोरं झाली आहेत, असे सांगणारे हे पाटील. आम्हीसुध्दा पाटील आहोत. पण अशा पाटलांमुळे आम्हाला आता पाटील म्हणवून घ्यायलाही लाज वाटते’, असे सांगून हा एक प्रकारे महिलांचा सुध्दा अपमान आहे. असा असंस्कृत, विकृत मनोवृत्तीचा माणूस तुम्हाला भीमा कारखान्याचा नेता म्हणून चालणार आहे का? असा सवाल माजी आ. राजन पाटील यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
भीमा कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतच उमेश पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी पुढे बोलताना, त्यांनी पुढं आणखी सांगितलं की लग्नाच्या आधी जी पोरं झाली आहेत, ती तुमच्या वयाची आहेत, असे सांगितले. म्हणजे बापच पोरांच्या नावाने बिल फाडत होता की काय माहीत? वयाच्या २४ ते २५ व्या वर्षी लग्नं झाली. त्या अगोदरच त्यांच्या पोरांना पोरं झाली आणि ती पोरं आता तुमच्या वयाची झाली आहेत. म्हणजे ते स्वतःची बिलं पोरांच्या नावाने फाडत आहेत. काय नेते…? असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला.
“मोहोळ तालुक्यातील जनतेच्या सहनशीलतेची मलाच कीव येऊ लागली आहे. असला नेता मोहोळ तालुक्याने तीनवेळा निवडून दिला. असला नेता मोहोळ तालुक्याच्या बोकांडी बसला. असला विकृत मनोवृत्तीचा माणूस, घाणेरडा माणूस मोहोळचा असेल तर आम्हाला तालुक्याचा म्हणून घेताना लाज वाटेल. पाटील म्हणून सांगायला लाज वाटेल, असा नेता भीमा कारखान्यात तुम्हाला चालेल का?”
– उमेश पाटील
(राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते)