‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने आता कुठे सा-या देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेले काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी जे विधान केले, त्यावरून राज्यात महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. अगोदर राज्यात सत्तासंघर्ष पेटलेला असतानाच राहुल यांच्या त्या विधानाने आगीत तेल ओतले गेले आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. Rahul Gandhi came up with the opposite wisdom while receiving response to ‘Bharat Jodo’ Yatra Maharashtra
सावरकर यांनी ब्रिटिश सत्ताधीशांना लिहिलेले एक पत्र राहुल यांच्याकडून उघड केले गेले आहे. मी आपला नोकर होऊ इच्छितो, असे सावरकर यांनी त्या पत्रात लिहिले होते तसेच सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल केला आहे. हे पत्र उघड करून राहुल यांनी सावरकरांच्या देशभक्तीविषयी जणू संशयच व्यक्त केला आहे. सावरकर हे इंग्रजांचे खबरे होते. ब्रिटिशांना ते सामील होते, अशी टीका काँग्रेसकडून नेहमीच केली गेलीय.
त्यामुळे राहुल यांनी सावरकरांविषयी नवी बाब शोधून काढलीय, असे म्हणताच येणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात, त्याप्रमाणे राहुल यांना मार्मिक शब्दात उत्तर दिले आहे. तेंव्हा राहुल यांनी तिथेच हा वाद थांबवायला हवा होता. परंतु आपण आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचे विधान पुन्हा एकदा करून त्यांनी या संघर्षाला ऊत आणले आहे. राहुल यांच्याविरुद्ध भाजपचे राज्यभर आंदोलन सुरू आहे पण, राहुल यांच्या या भूमिकेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडचणीत आली आहे. उध्दव यांचा पक्ष कट्टर हिंदुत्ववादी आहेच. पण २०१९ च्या निवडणुकीनंतर हे हिंदुत्ववादाचे सोवळे बाजूला ठेवत धर्मनिरपेक्ष असणाऱ्या दोन काँग्रेसबरोबर आघाडी करून उद्धव यांनी अडीच वर्षांची सत्ता उपभोगली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आम्ही अजूनही आघाडीसोबतच आहोत, असे ते सातत्याने सांगतात. पण राहुल यांच्या भूमिकेने उध्दव यांच्या हिंदुत्ववादाला धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर तोंड उघडावे लागले. कारण येत्या काळात राज्यात मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याच्या रणधुमाळीत उध्दव यांच्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजप हा मुद्दा करू शकतो. ही भीती उध्दव व संजय यांना लागून राहिलेली दिसते.
त्यातून राऊत यांनी आक्रमकपणा दाखवत राहुल यांना सावरकर प्रकरणी खडे बोल सुनावावे लागले. एकीकडे ठाकरे गटाकडून उध्दव यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली असली, तरी भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या बाजूने आपण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विधानानंतरही काँग्रेसशी असलेली आघाडी कायम असल्याचेच संकेत उध्दव ठाकरेंनी दिले होते मात्र, आता राउतांनी त्याच्या उलट सूतोवाच केले आहेत.
या विधानामुळे महाविकास आयाडीत फूट पडू शकते, अशी शक्यता राऊतांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रध्दास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील, असे राऊत म्हणाले. सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणारही नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. उध्दव आणि राऊत यांची भूमिका विसंगत दिसते. भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातले वातावरण हुकूमशाहीकडे नेणारे, देशाला गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारे झाले आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयावर त्यांची भारत जोडो यात्रा – सुरू आहे. असे असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचे काही कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे.
महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या वर्गाला वीर सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय पडले आणि काय नाही पडले हे चिवडत बसण्यापेक्षा जावा इतिहास निर्माण केला पाहिजे. सा-या देशात हा मतप्रवाह आहे. तेव्हा हे विधान म्हणजे राहुल यांची विपरीत बुध्दीच म्हणावी लागेल. दुसरे काय? राहुल यांच्या त्या विधानाने उध्दव यांची शिवसेना अडचणीत आली आहे. अगोदरच आपला पक्ष फुटला आहे. अशा स्थितीत आघाडीतून बाहेर पडल्यानंतर पुढचे राजकीय अस्तित्व काय? ही एक चिंता त्यांना लागलेलीच असावी. राऊत यांच्या इशाऱ्यानंतर काँग्रेस कोणती भूमिका घेते हे पहावे लागेल. यात्रा राज्यातून बाहेर गेल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात शीतयुद्ध सुरू होईल, असे वाटते.
📝 📝 📝
सुराज्य दैनिक संपादकीय लेख