□ सोलापूरच्या राजकारणात नवा सिद्धांत
सोलापूर : विजय गायकवाड
‘पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस’ केजीएफ मधील हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची झालेली निवडणूक. या निवडणुकीत कोल्हापूर येथील खा. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी कोल्हापूर वरून येत एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांच्या भोवती चार पाटलांचे राजकारण फिरले. पाहूयात विस्तृतपणे ते कसे…. Four Mathematical Formulas of Four Patals Around MP Dhananjay Mahadika Pandharpur Kolhapur Political
धनंजय महाडिकांच्या भोवतालच्या चार पाटलांचे चार गणिती सूत्र पाहुयात. सोलापूरच्या राजकारणात नवा सिद्धांत म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यात कुणी मायनस ( वजाबाकी) झाले. कोणी प्लस (बेरीज) झाले. कोणी मल्टिपल ( गुणाकार) तर कोणी डिव्हिजन ( भागाकार) करण्याचा कित्ता गिरवला आहे. हे होत असताना राजनमालकांची बाकी मात्र शून्य राहिली आहे.
एकूणच भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या गणितामुळे नवे सूत्र तयार होत असून सोलापूरच्या राजकारणात नवा सिद्धांत मांडला जाईल, अशी राजकीय जाणकारांमध्ये चर्चा आहे. मुन्ना महाडिक यांच्या भोवतालच्या या चार पाटलांचे चार प्रकारच्या गणितात वर्गीकरण करता येईल. हे एक या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.
( – ) राजन पाटील पिता पुत्र मायनस
मोहोळच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून एक हाती वर्चस्व अबाधित राखणारे माजी आमदार राजन पाटील हे या निवडणुकीत पूर्णतः मायनसमध्ये गेले आहेत. सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत असो किंवा मोहोळच्या विधानसभेच्या निवडणुकीत असो अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजन पाटील पिता पुत्रांनी या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.
मात्र त्यांना ठोस पुराव्यानिशी गंभीर आरोप ही करता आला नाही, की विकासाची ब्लू प्रिंट ही सादर करता आली नाही. सभांचा सपाटा लावूनही त्यांना मोहोळच्या मातीतील या कारखान्याच्या निवडणुकीत चितपट व्हावे लागले. कोल्हापूरच्या पैलवानाने बेरजेचे राजकारण केल्याने राजन पाटील पिता पुत्रांचे भीमा कारखान्यातील राजकारण टोटल मायनसमध्ये गेले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
(+ ) उमेश पाटील प्लसमध्ये
मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात रान पेटवण्याचे काम त्यांच्याच पक्षातील उमेश पाटील यांच्यामार्फत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. फ्री हिट वर फलंदाजी करणारा खेळाडू बिनधास्त फटकेबाजी करतो त्या पद्धतीने उमेश पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून राजन पाटलांविरोधात बोलण्याची एकही संधी सोडली नाही.
भीमा कारखान्याच्या निमित्ताने तगडा विरोधक समोर येताच त्यांनी धनंजय महाडिकांना हात मिळवणी केली आणि प्रचार सभांमध्ये विरोधी रान पेटवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला. यामध्ये महाडिकांचा विजय झाला असला तरी एकूणच राजकारणात उमेश पाटील आणखीनच प्लस मध्ये आले आहेत.
( X ) अभिजीत पाटील होताहेत मल्टिपल
एका मागोमाग एक अनेक कारखाने ताब्यात घेण्याचा सपाटा लावलेले अभिजीत पाटील हे सोलापूरच्या सहकार क्षेत्रातील नवा ब्रँड बनत आहेत. अशातच त्यांनी देखील धनंजय महाडिक यांच्या सोबत राहणे पसंत करून शेवटच्या काही सभांमधून महाडिकांना आपला सपोर्ट असल्याचे दाखवून दिले आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला पाठिंबा देण्यापेक्षा महाडिक गटाच्या पाठीशी राहणे हे बेरजेचे असल्याचे अभिजित पाटील यांनी ओळखले. त्यामुळे अभिजीत पाटील यांचे सोलापुरातील सहकारातील अगोदरच प्लस मध्ये असलेले राजकारण पुन्हा मल्टिपल (गुणाकार) होत चालले आहे.
( ÷ ) सतेज पाटलांची डिव्हिजन मोहीम
खा. धनंजय महाडिक यांचे काका माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याची सर्व सत्तासूत्रे एकवटलेली होती. ‘कुटं भी हुडीक मुन्ना महाडिक’ असे चित्र होते. त्यांच्यासोबतच सतेज पाटील यांनी राजकीय प्रवास सुरू केला. तेव्हा धनंजय महाडिक हे त्यांचे मित्र होते.
शिवसेनेकडून पहिल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुढे धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून निवडून आले. तेव्हा पाटील यांनी मदत केली नाही, असा आरोप करून महाडिक यांनी पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीला मोहीम उघडली. विधानसभा निवडणुकीतील पराभव सतेज पाटील यांना जिव्हारी लागला. तेव्हापासून त्यांनी महाडिक विरोधी मोहीम सुरू केली. त्याची सुरुवात नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवून केली.
पुढे विधान परिषद, लोकसभा विधानसभेत सलग नमवत ‘खटक्यावर बोट जाग्यावर पलटी’ची किमया साधली. म्हणजेच सर्व सत्ता केंद्र ताब्यात घेत महाडिक यांची सत्ता डिव्हीजन (भागाकार) करण्याचे काम सुरू केले.