सोलापूर : सोलापूरसह इतर सर्व महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना नव्याने तयार करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंगळवारी काढले आहेत. All municipalities including Solapur will have a new ward structure, how many members will be elected for the ward
नगरविकास विभागाचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी याबाबत तयार करावी अशा सूचना सर्व आयुक्तांना दिल्या आहेत. मात्र नव्याने होणार्या प्रभाग रचना किती सदस्यांची असणार याबाबत मात्र कोणताही खुलासा नसल्याने याची उत्सुकता वाढली आहे. राज्य शासनाच्या या आदेशाने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
2014 मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर त्यांनी नव्याने प्रभाग रचना करत चार सदस्यीय पद्धत अवलंबली होती. याचा फायदा भाजपला झाला. बहुतांश महापालिकेवर भाजपाने सत्ता मिळवली. मात्र त्यानंतर 2019 मध्ये सेना- राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे महाआघाडी सरकार आल्यावर त्यांनी भाजपाने केलेली प्रभाग रचना रद्द करून नवी रचना केली आणि 3 सदस्यांचा प्रभाग झाला. मात्र ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. त्यानंतर जूनमध्ये महाआघाडी सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकार आले, त्याचवेळी प्रभाग रचना नव्याने होणार असा अंदाज बांधाला जात होता.
अखेर मंगळवारी सोलापूरसह इतर सर्व महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना नव्याने तयार करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढले. यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच सोलापूर महापालिकेसह इतर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. हा आदेश निघाला असला तरी प्रभाग किती सदस्यांचा असणार आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● महाआघाडीला बसणार धक्का
महाविकास आघाडीने नव्याने प्रभाग रचना करत तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या सोयीनुसार प्रभाग रचना केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात होता. सोलापूरचा विचार करता प्रभाग रचनेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यामुळे इच्छुकांचा ओढा पक्षाकडे वाढला होता. मात्र महाआघाडी सरकार कोसळल्याने राष्ट्रवादीला गळती लागली आहे. अशातच आता प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार असल्याने राष्ट्रवादीमधून आणखी आऊट गोईंग होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
● भाजपाचे राहणार वर्चस्व
नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जूनमध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आले आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवर भाजपाचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. सोलापूर महापालिकेचा विचार करता मागिल प्रभाग रचना भाजपसाठी जरा धक्कादायक मानली जात होती. मात्र आता नव्याने होणार्या प्रभाग रचनेत भाजप आपला प्रभाव दाखवण्याची शक्यता आहे.
● चार सदस्यीय प्रभाग ?
2017 प्रमाणे यंदाही चार सदस्यीय प्रभाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही पद्धत भाजपासाठी लाभदायक आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही चार सदस्यीय प्रभाग पद्धतच होईल, असे भाजपाचे लोकप्रतिनिधी बोलत आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसारच २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत जी प्रभाग संख्या होती तेवढीच संख्या निश्चित करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत ज्या महापालिका हद्दीत गावे वगळली किंवा नव्याने समाविष्ट करण्यात आली, अशा महापालिकांतील नगरसेवकांची संख्या बदलणार आहे. पुणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या तीन महापालिका हद्दीत गावे वगळली किंवा समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित महापालिकांची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच होण्याची शक्यता आहे.