□ ७३ कोटी ८० लाखांचा आराखडा तयार, ३० नोव्हेंबरला मुंबईत विशेष बैठक
पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता मुळ स्वरुपात दिसणार आहे. 700 वर्षांपूर्वी मंदिर कसे होते, त्यानुसार मंदिराची रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज यांच्या काळातील मंदिर कसे होते ते अनुभवता येणार आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली यासाठीची हाय पॉवर समितीची बैठक 30 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. Vitthal temple in its original form; The work will be done in five stages, a special meeting will be held in Mumbai at Santakaleen Pandharpur
उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरमधील श्रीविठुरायाचे मंदिर नव्या रूपात दिसणार आहे. ७०० वर्षांपूर्वीच्या काळातील लूक या मंदिराला देण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत. या कामासाठी ७३ कोटी ८० लाखांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ३० नोव्हेंबरला मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बोलावण्यात आली आहे.
कॉरिडॉरच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच या एका आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या – काळातील म्हणजे ७०० वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याची उत्कंठा तमाम वारकऱ्यांना लागून राहिली असताना आता राज्य शासनाने यासाठी ३० नोव्हेंबरच्या बैठकीनंतर लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आराखड्याची विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ७३ कोटी ८० लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी ७३ कोटी ८० लाखांची तरतूद केली होती.
मात्र, यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यावर काही अधिकाऱ्यांनी नव्याने दुसऱ्या आर्किटेक्चरकडून पुन्हा नव्याने आराखड्याचे काम सुरु केल्याने हा प्रकल्प रेंगाळणार अशी चिन्हे दिसत असताना राज्याच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली यासाठीची हाय पॉवर समितीची बैठक मुंबई येथे बोलावल्याने आता लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विठुरायाच्या बाबतीत ‘नाही घडविला, नाही बैसविला’ ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे ११ व्या शतकातील असल्याचे अभ्यासक म्हणत असले तरी त्याही पूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. आता पुन्हा ७०० वर्षापूर्वीच्या मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार बनविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या आराखड्याची पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे, अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणणार आहेत.
● पुरातन दगडात महाद्वार…
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराचे आरसीसीचे काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक बनविला जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा, वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिराच्या विकास आराखडा आणि इतर प्रश्नासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळत त्यासाठी ७३ कोटी ८० लाखांची तरतूद देखील केली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने हे काम तातडीने सुरु केले तर येत्या पाच वर्षात जगभरातील लाखो विठ्ठल भक्तांना ७०० वर्षापूर्वीचे म्हणजे संत कालीन विठ्ठल मंदिर पहाण्याचे भाग्य भाविकांना लाभणार आहे.