सांगली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आहे. दरम्यान कर्नाटकने आज महाराष्ट्रातील जत भागातील काही भागात पाणी सोडले आहे. कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले आहे. यातून महाराष्ट्राला खाली दाखवण्याचा प्रयत्न केल्याची नागरिकांची भावना आहे. Attempt to defeat Maharashtra: Karnataka left water in Maharashtra’s Jat
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागात ४२ गावांच्या दाव्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र, या तापलेल्या वातावरणात कर्नाटकाकडून काल बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिकोंडी तलाव एकाच दिवसात ओहरफ्लो झाला आहे. शिवाय, दाव्याप्रमाणे कर्नाटक नैसर्गिकरित्या या वंचित गावाला न्याय देऊ शकतो, असे भासविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे.
महाराष्ट्राने पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता दिली. असं असतानाही जतमध्ये अलिकडच्या काळात दिवसेंदिवस काही ना काही घडामोडी घडत आहेत. आजही दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला असल्याचं समोर आलं आहे.
कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावांवर कर्नाटकने हक्क सांगितला असताना पूर्व भागाचा प्रलंबित पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. जत पूर्व भागातील 65 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण होईपर्यंत तातडीने पूर्व भागातील काही तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून घेता येउ शकतील का? याचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पाहणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जत दौर्यावर होते.
कर्नाटकने सीमावर्ती भागासाठी तुबची बबलेश्वर योजना गतीने पूर्ण केली. या योजनेतून कर्नाटकातील इंडी आणि चडचणसाठी जत पूर्व भागातील तिकोंडीसह काही गावातून नैसर्गिक उताराने पाणी जाऊ शकते. याच स्थितीचा फायदा उठवत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने बुधवायपासून या योजनेचे पाणी यतनाळ ओढापात्रात सोडले. या पाण्यामुळे तिकोंडी तलाव आज गुरूवारी (ता.1 डिसेंबर) ओसंडून वाहू लागला आहे. या कृतीद्वारे सीमावर्ती भागास कर्नाटकच तातडीने पाणी देऊ शकते हे दाखविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केलाय.
दरम्यान, म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत वस्तुस्थिती निदर्शक अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना शासनाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी आज गुरूवारी जतचा पाहणी दौरा केला. जिल्हाधिकार्यांनी आज तिकोंडी तलावाची पाहणी केली, तसेच श्रीक्षेत्र गुड्डापूर येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेउन उमदीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी जतच्या भौगोलिक स्थितीची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार्याकडून नकाशाद्वारे घेतली.