बार्शी : आपल्या विविध मागण्यांसाठी १५ दिवसांपासून चिखर्डे येथील रामचंद्र कुरूले हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत गावातील स्मशानभूमी येथे साखळी उपोषण सुरू केले होते. या साखळी उपोषणादरम्यान रविवारी (ता.4) उपोषणकर्ते रामचंद्र कुरूले यांचा मुलगा संभव (वय १० ) याचा मृत्यू झाला. Report that the CEO will conduct an inquiry into the death of Barshi Chikharde, a disabled person
दरम्यान, या प्रकरणी आंदोलनकर्त्यांनी यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिखर्डे येथे भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, याप्रकरणी बार्शीचे गटविकास अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले की ते वैद्यकीय रजेवर गेले याबाबत संभ्रम असून कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच याबाबत चौकशी समिती नेमून अहवाल पाठविण्यात येणार आहे.
शासनाने दिव्यांगासाठी जि.प.पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांगासाठीच्या ५ टक्के निधीमधून अपंगासाठी कोणत्या योजना हाती घेण्यात याव्यात याबाबत सर्व अधिकारी जि.प., पं.स. ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित संस्थांनी आपल्या स्वनिधीतील जमा रक्कमेपैकी ५ टक्के निधी अपंगासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. चिखर्डे येथील रामचंद्र कुरूले यांची वैष्णवी व संभव ही दोन अपत्ये दिव्यांग. त्यांनी तीन महिन्यापूर्वी दिव्यांगासाठीच्या निधीसाठी असेच उपोषण केले होते. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी वैष्णवी हिचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता.
त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदतीबाबतचे आश्वासन दिले होते. ही आश्वासने पाळली नाहीत, असे आंदोलनकर्ते रामचंद्र यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागील १५ तारखेपासून ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला परवानगी न मिळाल्याने त्यांनी गावातील स्मशानभूमी येथे साखळी उपोषण सुरू केले होते. या साखळी उपोषणादरम्यान तहसील प्रशासनाने त्यांची भेट घेवून तुमचा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीबाबतचा प्रस्ताव दुरूस्त करून पुन्हा पाठवल्याचे सांगून उपोषणापासून संबंधितांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलनकर्ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. या दरम्यान त्यांचा मुलगा संभव याचा दि. ४ रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केले.
चिखर्डे येथील दिव्यांग मुलाच्या कुटूंबियास प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही. या कारणास्तव प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी चिखर्डे येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ घडला नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, चिखर्डे येथील अल्पवयीन मुलाच्या मृत्यनंतर प्राताधिकारी हेमंत निकम यांनी रविवारी (दि. ४) गावाला भेट देवून मृताच्या कुटूंबियांशी चर्चा केली. तहसीलदार सुनिल शेरखाने, नायब तहसीलदार संजीवन मुंडे, काझी यांनी चिखर्डे येथे भेट देवून चर्चा केली. यावेळी पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दि. ५ रोजी सायंकाळी नातेवाईकांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आले. संभवचा मृतदेहाचे पांगरीच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजून येईल.
बीडीओ बिचकुले यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याबाबत चौकशी समिती नेमून जि.प.चे सीईओ शासनास अहवाल सादर करणार आहेत. तसेच जि.प.चे सीईओ यांच्यासमवेत आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे हेमंत निकम (प्रांताधिकारी, बार्शी ) यांनी सांगितले.
दिव्यांग निधी त्यांच्या दोन्ही मुलांना मिळाला आहे. त्यांना विविध साहित्य मंजूर केले. याशिवाय विविध योजनेअंतर्गत मदतीबाबतचे प्रस्ताव विविध विभागाकडे मी पाठवले आहेत. त्यांना कोणत्याही लाभापासून वंचित ठेवलेले नाही. कांही विषय महसूल प्रशासनाच्या अखत्यारीतील आहेत. आमच्या स्तरावरून त्यांना जेवढी मदत करता येईल ती केली आहे. मुलांना घेवून उपोषणाला बसू नका. त्याची काळजी घ्या असा सल्ला सुध्दा मी दिला होता. मी डेप्युटी सीईओ यांना वैद्यकीय रजा मागणीचा अर्ज दिला आहे. मी वैद्यकीय रजा घेतली असल्याचे माणिकराव बिचकुले, (गटविकास अधिकारी, बार्शी ) यांनी सांगितले.
कुरूले कुटूंबाचा मुख्यमंत्री सहायता मधून मदतीबाबतचा प्रस्ताव दुरूस्त करून पुन्हा पाठवला आहे. आंदोलनकर्त्यांना याबाबत अवगत करून उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नोटीस स्विकारली नसल्याचे संजीवन मुंडे (नायब तहसीलदार, बार्शी) यांनी सांगितले.