सोलापूर / विजय गायकवाड : विमानसेवा सुरू नसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एक कन्या पायलटचे स्वप्न पाहू शकते, हीच मोठी पॉझिटिव्ह बाब आहे. केवळ स्वप्न न पाहता तेे स्वप्न युके आणि कॅनडातून शिक्षण पूर्ण करून साकारण्याची किमया ‘राजन कन्या’ अर्थातच ऋतुजा राजन पाटीलने करून दाखवली आहे. Airline landings required for takeoff of development; Royal daughter Rituja Patil’s air trip to Mohol Angar Solapur
फॉरेनच्या या पायलटच्या हवाई सफरीचा प्रवास तितकाच रंजक आणि प्रेरणादायक आहे, हे त्यांच्याशी अनगरवरच्या बंगल्यात झालेल्या गप्पांमधून उलगडत गेला. मोहोळच्या राजकारणातील एक्का असणारे माजी आमदार राजन पाटील यांच्या बंगल्यावरील गप्पांमध्ये राजकीय चर्चांना बायपास करत केवळ पायलटच्या नजरेतून सोलापूर शहराच्या विकासावर टाकलेला दृष्टिक्षेप आणि एक कन्या पायलट म्हणून आकाशात भरारी घेताना आलेले अनुभव या सार्या गोष्टी आजच्या नव्या पिढीला भरारी घेण्यासाठी गरजेच्या वाटतात.
आपली लहानपणापासूनच खूप मोठ मोठी स्वप्ने असतात, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, कुणाला शिक्षक, कुणाला पायलट, कुणाला वैज्ञानिक, कुणाला उद्योजक व्हायचे असते, पण ते स्वप्न कसे साकार करायचे हेच कळत नसते. कारण ती स्वप्ने साकार करण्यासाठी काय करावे, कोणते शिक्षण घ्यावे हेच त्यांना माहीत नसते त्यामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात. पण नजरेत स्वप्न आणि पाठीशी आई-वडील भक्कम उभे असली की गगनात भरारी घेणे अवघड नसते, हेच पायलट ऋतुजा पाटीलने दाखवून दिले आहे.
पायलट बनून आकाशात भरारी घेण्यासाठी पंख मिळाले असले तरी पाय जमिनीवर ठेवत संस्कारचे बीज याच मातीतून मिळाले असल्याची जाणीव ठेवणे हे यशाचे पहिले गमक ऋतुजा पाटील यांना गवसल्याचे प्रथमदर्शनीच जाणवत होते. फॉरेन रिटर्न्स या दोन शब्दातच अंगावरचे मास दस पटीने वाढत असते. डोक्यात अहंमभावाचा इगो डिस्को करतो किंवा तसे करण्यास पोषक वातावरण असते.
मात्र सहा – सात वर्ष परदेशात राहूनही स्पर्धेच्या युगात परदेशी कल्चर उपयोगाचे असले तरी जीवनात जगण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी भारतीय संस्कृतीला तोड नाही, याची जाण या राजकन्येला आहे. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी परदेशातील शिक्षणाचा उपयोग होत असला तरी संस्कार आणि आपलेपणाची परंपरा केवळ भारतातच असल्याचे ऋतुजा पाटीलने अगदी नेमक्या शब्दात सांगितले.
● कमी वयात जास्त देशांची सफर
जिना यहॉं मरना यहॉं.. एवढ्या वाक्यातच कित्येकांचे आयुष्य सरतात मात्र ऋतुजा पाटील तारुण्यातच आपल्या वयापेक्षा जास्त म्हणजेच 35 देशांची सफर कमी वयात पूर्ण केली आहे. त्यामुळे जगाच्या कल्चरची ओळख होण्यास मदत झाली असून त्यातूनच जगभर फिरण्याचा छंद जडला आहे.
● राजकारणाच्या ‘रनवे’वर नो ‘फ्लाईंग’
वडील राजकारणात एक मोठे प्रस्थ आहेत. किंग म्हणून आणि किंगमेकर म्हणून त्यांनी आजपर्यंत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. असा घरातच राजकारणाचा ‘रनवे’ खूप चांगला असताना देखील आपणाला राजकारणात इंटरेस्ट नाही. त्यामुळे या राजकारणाच्या ‘रनवे’वर भविष्यातही कधी ‘फ्लाईंग’ करण्याची इच्छा नसल्याचे सांगत पायलट ऋतुजा पाटीलने राजकारण आवडीचा विषय नसल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पुणे – नागपूर हवाई सफरमध्ये मी एक स्वप्न पाहिले
वडील आमदार असल्याने ते नागपूरला हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे जात असताना आईसोबत मी पुणे- नागपूर प्रवास विमानाने केला. त्यावेळी मी सातवीत होते. हवाई सफर करत असताना पायलट ही एक महिला होती. तिला पाहून तेव्हाच स्वप्नाचे पहिले बीज रोवले गेले. आई मलाही या महिलेप्रमाणे पायलट व्हायचंय, असं आई-वडिलांना बोलून दाखवले आणि पुढे या स्वप्नाचा पाठलाग करताना सर्वांच्या सहकार्याने स्वप्न सत्यात उतरले, असे ऋतुजा पाटीलने अभिमानाने सांगितले.
□ बिझनेस वूमन बनण्याचे टार्गेट
पायलट झाल्यानंतर कुठल्या तरी ऐअर लाईन्सला जॉईन होऊन गेलेलठ्ठ पगार पदरात पाडून घ्यावा आणि सेटल व्हावं, हा चाकोरीबद्ध विचार ऋतुजा यांना कधी शिवलाच नाही. त्यांना पायलटच्या कौशल्याचा वापर फक्त छंद जोपासण्यापुरता करायचा आहे. तर भविष्यात एक बिझनेस वुमन म्हणून पुढे यायची इच्छा त्यांची आहे. त्यामुळे पायलटकडे त्या करिअर म्हणून पाहत नसून केवळ देशभर फिरण्याच्या आपल्या छंदाला जोडणारा दुसरा छंद समजतात.
¤ आवडीचे देश : युके आणि स्पेन
भारतातील आवडीची बाब : भारतीय कल्चरमधील सर्वांना जोडून ठेवणारी कुटुंब पद्धती
□ भारतात आवश्यक असणारी बाब
– जेंडर इक्व्यालिटी
– टॅलेंटचा सन्मान
– महिलांचा सन्मान
फिरायला परदेश – राहायला स्वदेश
परदेशातील विविध देश खूप पुढारलेली आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने व इतर प्रगती झालेले देश आहेत. अशा देशांना भेटी देऊन त्यांच्याकडील चांगल्या बाबी शिकल्या पाहिजेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला परदेशातील देश आवडतात मात्र राहायला भारत देशच चांगला असून भारतातच राहणार असल्याचे ऋतुजा या ठाम आत्मविश्वासाने सांगतात.
● पायलटच्या नजरेतून….
विमान टेकऑफ आणि लँडिंग करत असताना वेळ आणि पिक पॉईंट महत्त्वाचा असतो. कोणत्याही परिस्थितीत तो मिस करून चालत नाही. त्यामुळे तो मिस झाल्यास विमानाला पुन्हा चक्कर मारून तो पॉईंट पकडावा लागतो. त्यामुळे टेक ऑफ घेत असताना आणि लँडिंग करत असताना विमान सेवेच्या परिघात कुठलेही अडथळे असू नयेत, हा नियम जगाच्या पाठीवर सर्व विमानतळे पाळत असतात.
● शिक्षण : माध्यमिक शिक्षण सेंट हेलन हायस्कूल पुणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले आहे. बीएससी मॅनेजमेंट शिक्षण इंग्लंड येथे तर कर्मशिअल पायलेट फॉर एअरोप्लेनचे शिक्षण कॅनडा येथे पूर्ण केले आहे.
● स्पर्धेत टिकायचे तर विमानसेवा आवश्यकच
आजचे युग फास्ट झालेले आहे. प्रत्येक गोष्ट वेगवान झालेली आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असल्यास तो वेग आत्मसात केला पाहिजे. कोणत्याही शहराचा आणि देशाचा विकास होण्यासाठी त्या भागात विमानसेवा असणे अत्यावश्यक आहे.
विमानसेवा असल्याशिवाय त्या शहराचा विकास होणे शक्य नाही. विमानसेवा असल्यास केवळ प्रवासच वेगवान होतो असे नाही तर विमानसेवेतून ट्रान्सपोर्टची कामे जलद गतीने होऊ शकतात. सर्वात सुरक्षित आणि ट्रान्सपोर्टची व्यवस्था विमानसेवेच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे ज्या भागाची प्रगती साधायची आहे त्या भागात विमानसेवा असणे आवश्यक आहे. त्याला दुसरा पर्याय नाही, असे त्या ठामपणे पायलटच्या नजरेतून सांगत होत्या.