● “एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र”…. “श्री सिद्धेश्वर महाराज की जय” चा जयघोष !
● नंदीध्वजांच्या मिरवणुकीने 68 लिंगांना तैलाभिषेक
● बाल गोपाळांचाही बाराबंदीत उत्साहात सहभाग !
● छ. शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या वतीने पुष्पवृष्टी
सोलापूर : एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र…. श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सकाळी मानाच्या नंदीध्वजांसह पालखी पूजेनंतर नंदीध्वज मिरवणुकीने आज 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात आले. Solapur Barabandi started the Yatra of Shri Siddharameshwar with Oil Abhishek in a devotional atmosphere
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात आज शुक्रवारी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. कोरोना निर्बंधानंतर यंदा मोठ्या उत्साही वातावरणात ही यात्रा सुरू होत आहे. भक्तिमय व मंगलमय वातावरणात धार्मिक विधी पार पडला. यावेळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्याभोवती भक्तांची एकच गर्दी होती. सकाळी सुमारे नऊ वाजता उत्तर कसब्यातील प्रमुख हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून या तैलाभिषेकासाठी नंदी ध्वजांची व पालखीची मिरवणुक मार्गस्थ झाली.
यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू , मनोज हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू , शिवानंद हिरेहब्बू आणि जगदीश हिरेहब्बू, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन तसेच मानाचे पहिल्या आणि दुसर्या नंदीध्वजाचे पूजन यावेळी मोठ्या मंगलमय वातावरणात आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर आरती करून करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी मनोभावे आरती केली.
यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्यासह वाड्यातून पालखी आणि मानाचे सातही नंदीध्वज मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी श्री सिद्धेश्वर भक्तांची पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती भक्तांचा जनसागर जणू लोटला होता. अबालवृद्ध भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.
पारंपरिक बाराबंदी पोशाख परिधान करत चिमुकल्यांनी आपल्या हाती प्रतिकात्मक नंदीध्वज धरला होता. मंगलवाद्याच्या तालावर सदरची मिरवणूक तैलाभिषेकसाठी रवाना झाली. तत्पूर्वी महापालिका आयुक्त शीतल तेली , महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त विद्या पोळ यांनी पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे मनोभावे पूजन केले. त्यानंतर प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी यात्रेच्या धार्मिक विधीबाबत अधिक माहिती दिली. पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या नंदीध्वजाचे मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते , ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी नगरसेवक अमोल शिंदे , काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे , काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, केदार उंबरजे, महापालिका आयुक्त शितल तेली – उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापालिका उपायुक्त विद्या पोळ, पोलीस उपायुक्त संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वपोनि उदयसिंह पाटील, बार असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मिलिंद थोबडे, माजी आमदार शिवशरण बिराजदार, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, काँग्रेसचे सुशील बंदपट्टे, अंबादास गुत्तीकोंडा, राहुल वर्धा, तिरुपती परकीपडला, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, विजय पुकाळे, हेमा चिंचोळकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज : आयुक्त तेली – उगले
श्री सिद्धेश्वर यात्रेस विविध धार्मिक विधीने मंगलमय वातावरणात प्रारंभ होत आहे. देशभरातून लाखो भावीक येतात. भक्तांचा उत्साह बघायला मिळत आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून प्रदक्षिणा मार्गावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ही यात्रा निर्विघ्न पार पाडावी यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज आहे असे सांगत महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शुक्रवारी सकाळी हिरेहब्बूंच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची विधीवत पूजा झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज व श्री सिद्धेश्वरांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक मोठ्या उत्साही वातावरणात सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. ढोल, ताशे, हलग्यांचा कडकडाट, बँड पथक या पारंपरिक वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक पुढे निघाली. बँजो पथकाकडून विविध भक्ती गीते ही सादर करण्यात येत होती. पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक दुपारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगास हळद आणि तेल लावून तैलाभिषेक करण्यात आला.
त्यानंतर पान ,सुपारी, तांदूळ असलेला विडा ठेवून पूजा करण्यात आली. मंदिरातील श्रींच्या गदगीस आणि श्री सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीसही हळद, तेल लावून तैलाभिषेक करण्यात आला. या ठिकाणी थोडा वेळ विसावा घेतल्यानंतर नंदीध्वजांची मिरवणूक 68 लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली.
या यात्रेतील सर्व धार्मिक विधी पार पाडण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. नंदीध्वज मानकरी यांनीही मिरवणूक शिस्तबद्ध रित्या पार पाडण्यासाठी नियोजन केले.
विजापूर वेस येथे मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
विजापूर वेस येथे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या वतीने नंदीध्वज मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मतीन बागवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सम्राट चौक जवळील वीरकर गणपती मंदिर येथे समिती व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या वतीने भाविकांना दूध वाटप करण्यात आले. दरम्यान, यावेळी मिरवणूक मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.