□ पालकमंत्र्यांनी आश्वासनांचे विमान उडवले
सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी सोलापुरात आश्वासनांचे विमान उडवले. त्यामुळे काहीजण सुखावले आहेत. तर काहीजणांचे टेन्शन वाढले आहे. साखर कारखान्याच्या गळित हंगामानंतर चिमणीवर कारवाई होणार आणि बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री विखे – पाटील यांनी सांगितले. After the sugar factory leak, action will be taken against Chimney; Will try for Boramani Airport: Guardian Minister Vikhe-Patil
सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा मूलभूत गरज आहे. मात्र होटगी रोड विमानतळावरुन विमानसेवा चालु करण्यासाठी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीची अडचण आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणांची कायदेशीर अडचण दूर झाली आहे. कारवाईची प्रक्रिया सर्व यंत्रणांनी पूर्ण केली आहे.
कारखान्याला कारवाईची अंतिम नोटीस देखील दिली आहे. मात्र सध्या कारखान्याचा गळीत हंगाम चालू आहे. गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान नको म्हणून हंगाम संपण्याची आणि कारखाना बंद होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. कारखाना बंद झाल्यानंतर कारखान्याच्या चिमणीसंदर्भात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. नियोजन भवनातील बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सोलापूरच्या विमानतळाविषयी भाष्य केले. सोलापूर शहरांमध्ये पायाभूत सुविधा आहेत. मात्र विमानसेवेअभावी गुंतवणूकदार शहरांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. आता शहरासंदर्भातील सर्व क्षेत्राचा विकास आराखडा तयार करून राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. पर्यटन आणि रोजगाराला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र सोलापूरच्या विकासासाठी विमानतळ ही मूलभूत गरज असल्याचे म्हटले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ प्राधिकरणाकडील सुनावणीसाठी बैठक
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडसर दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन, प्रदूषण महामंडळ, पाणी पुरवठा, राज्य शासन आणि इतर यंत्रणांनी कारवाईची सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्ण केली आहे. विमान प्राधिकरणाकडे यासंदर्भात एक सुनावणी प्रलंबित आहे. ही सुनावणी तात्काळ घेण्यासाठी आपण नागरी हवाई वाहतूक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. बैठकीची मागणी देखील केली आहे. हा विषय निकाली काढला जाईल, असा शब्दही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
■ बोरामणी विमानतळासाठी पाठपुरावा
माळढोक अस्तित्वात आहे की नाही, हे कुणालाच माहित नाही. वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखिल हा माळढोक दिसला नाही, असे वनविभागाचे अधिकारी सांगतात. असे असताना त्यासाठी विमानतळाचा विकास अडवून ठेवणे योग्य होणार नाही. वनविभागाची जागा मिळवून देण्यासाठी आपण बैठक घेऊन मार्ग काढू आणि बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास पालकमंत्री विखे- पाटील यांनी दिला.
■ शेतकऱ्यांचे नुकसान नको
सध्या कारखान्याचा सगळीत हंगाम चालू आहे. गळीत हंगामामध्ये कारवाई केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. गळीत हंगाम संपल्यावर कारखान्याच्या चिमणीसंदर्भात कारवाई केली जाईल. कोणत्या एका व्यक्तीसाठी शहराचा विकास रखडणे हे भूषण नाही, विमानसेवा चालू होणे ही काळाची गरज आहे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी यावेळी मांडली.