» दोन कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काम न देण्याचा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
सोलापूर : डीपीसी बैठकीत जलजीवन मिशनच्या कामावरून आमदार आक्रमक झाले. दोन कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काम न देण्याचा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. MLA aggressive DPC meeting planning building on the work of Jaljeevan Mission
पंतप्रधान जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठ्याची कामे करणारे ठेकेदार मुदतीत कामे करीत नाहीत. पाणीपुरवठा विभागाकडून पुन्हा त्यांनाच कामे दिली जात आहेत. पंतप्रधानाच्या योजनेला काळिमा फासण्याचे काम केले जात आहे. निविदा प्रक्रियेत अनियमितता असताना त्यांना कामे का असा संतप्त सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदारांनी विचारत काळ्या वादीत टाळण्याची मागणी केली. मात्र कारवाई नको असा प्रथम पवित्रा घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी सर्व आमदारांचा रोष पाहता ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबरोबरच ज्या ठेकेदारांची दोन पेक्षा अधिक कामे अपूर्ण आहेत, अशा ठेकेदारांना पुन्हा काम न देण्याचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिला
शुक्रवारी (ता. 13) नियोजन भवनात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा, पीकविमा, समांतर जलवाहिनी, हदवाढ भागातील शाळा यासह शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. सभा चालू होताच आ. सुभाष देशमुख यांनी जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा प्रश्न उपस्थित केला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे येथील संभाव्य लोकसंख्या व वाड्या वस्त्यांचा विचार न करताच निविदा प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात आली. शिवाय अगोदर कामे अर्धवट ठेवलेल्या ठेकेदारांनाच पुन्हा ते काम देण्यात आले. याप्रकरणी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गडबडी झाल्याचा आरोप आ. सुभाष देशमुख यांनी केला. या आरोपाचा धागा संजय शिंदे, राजेंद्र राऊत,
पकडत आ. बबनराव शिंदे, यशवंत माने हे देखील आक्रमक झाले. ठेकेदारांचे लाड कशासाठी केले जातात? त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी सर्व आमदारांनी केली. मागील नियोजन समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा अभियंता दीपक कोळी यांची चौकशीसाठी समिती नेमली होती. त्याचा चौकशी अहवाल आला का? असा प्रश्न आ. सुभाष देशमुख यांनी केला.
आमदारांची आक्रमकता पाहता पालकमंत्री विखे-पाटील यांनी सुरू असलेली कामे पूर्ण करून घेऊन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली. तसेच जलजीवनचा नव्याने आराखडा करताना वाड्या, वस्त्या व राहिलेल्या भागाचा समावेश करण्याच्या सूचनाही दिल्या.
आ. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील
बंद पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा उपस्थित करून या योजनांच्या वीजबिलाकडे लक्ष वेधले. योजना कागदावर आहेत मात्र लाखो रुपयांची बिले ग्रामपंचायतीच्या डोक्यावर असल्याचा आरोप केला. याबाबत महाराष्ट्र प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता याबाबत अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तर दिले नाही. त्यामुळे अधिकाऱ्याला चांगले झापले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● दीपक माळींवर कारवाई
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांचा अहवाल चौकशी समितीकडून प्राप्त झाला आहे. यामध्ये कोळी दोषी आढळून आले आहेत. समितीच्या अहवालानुसार कोळी यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
□ हद्दवाढीतील शाळांचा विषय पुन्हा चर्चेला
हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळांचा विषय बैठकीत पुन्हा चर्चेला आला. या शाळा अजूनही महापालिकेकडे हस्तांतरण झाल्या नसल्याचा मुद्दा आ. सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. आता पालिका आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. हा निर्णय लवकर व्हावा अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी आ. संजय शिंदे यांनी या विषयात हस्तक्षेप करत जिल्हा परिषदेचा मिळणारा निधी दिवसेंदिवस कमी होत आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या त्या जागा आहेत. त्याची एनओसी जिल्हा परिषदेने दिली आहे. परंतु त्याचा मोबदला का दिला जात नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पालकमंत्र्यांनी सुवर्णमध्य काढत शाळांच्या जमिनीची रक्कम किती होते, तो आकडा काढा अशी सूचना महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली.
□ पीक विम्यामध्ये सावळा गोंधळ : खा. रामराजे निंबाळकर
बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून भरपाई मिळाली नसल्याचा मुद्दा उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी बाजू मांडली. परंतु त्यावर यांचे समाधान झाले नाही. एकाच गटातील एका भावाला पाचशे रुपये आणि दुसऱ्या भावला पंधरा हजार रुपये भरपाई मिळाली, ही तफावत कशी काय ? विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे घेऊन काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विमा कंपनीने केलेले पंचनामे मागवून घेऊन ते ग्रामपंचायतीमध्ये लावा, त्याचे सोशल ऑडिट करा, सर्व काही बाहेर येईल, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले. याप्रकरणी लक्ष घाला, पाठपुरावा करा आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा. जमत नसेल तर मुंबईत, या असे फटकारले.
● कोणी काय विचारले ?
• धैर्यशील मोहिते-पाटील : चौदाव्या वित्त आयोगाच्या बँकेत जमा असलेल्या रक्कमेवर बँक ऑफ इंडिया व्याज का देत नाही ?
• आ. रणजितसिंह मोहिते-पाटील : जिल्हा परिषद शाळांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्याचे काय झाले ?
• अमोल शिंदे : स्मार्ट सिटीच्या कामाचे आणि समांतर जलवाहिनी कामाचे नेमके स्टेटस काय आहे? काळ्या यादीत टाकलेल्या मक्तेदारांना पुन्हा काम कसे दिले ?
• अण्णाराव बाराचारे : एमआयडीसीतील दूषित पाण्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. शाळा वॉल कंपाउंड व पशुसंवर्धन दवाखान्याच्या इमारती बाधित झाल्या आहेत, त्यांना निधी आला आहे. तो निधी त्यांचा कामासाठी वापरण्याची मागणी केली.
• आ. सचिन कल्याणशेट्टी : कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले का मिळाले नाही ?
● पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची गाडी अडवली; दोघे ताब्यात
पालकमंत्री महोदय… वेळ द्या… वेळ द्या… असे म्हणत मोहोळमधील दोन युवकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गाडीसमोर आडवे पडले. अतिक्रमण काढण्यास चालढकल केले जात असल्याच्या निषेधार्थ हे कृत्य केल्याचे दोन तरुणांनी सांगितले. यामुळे पोलिस यंत्रणेची चांगलीच धावफळ झाली. या दोघाना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मोहोळ तालुक्यातील मौजे तांबोळे येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधले जात आहे. हे अतिक्रमण काढावे म्हणून ग्रामपंचायत तसेच मोहोळचे बीडीओ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले. त्याची अद्याप दखल घेतली नाही. ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे या अतिक्रमणाला अभय दिले जात असल्याचा आरोप केला.
याबाबत आपण पालकमंत्र्यांना इशारा दिला होता. त्यामुळे आज आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गाडीसमोर आडवे आलो असल्याचे अभिजित नेटके यांनी सांगितले. नेटके यांनी केलेल्या अचानक कृत्यामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ झाली दोंघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.