सोलापूर : रेल्वेतून प्रवास करीत असताना विवाहिता डब्यातच प्रसूत झाली. बाळ आणि बाळंतीणीला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता बाळ उपचारापूर्वी दगावले. ही घटना तळवळ रेल्वे स्थानक ते सोलापूर या दरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. Woman gives birth in train compartment; The baby died; Balantin Sukhrup Rajasthan Karnataka Solapur
मूळ राजस्थान येथे राहणारे दाम्पत्य बेंगलोर (कर्नाटक) येथे कामाला होते. राजस्थान येथे जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे ते सर्वजण रेल्वेतून बेंगलोर ते राजस्थान असा प्रवास करीत होते. गर्भवती असलेली विवाहिता पहाटे तीन वाजेच्या सुमारास बोगीत प्रसुत झाली. आणि तिला कन्यारत्न झाले. त्यानंतर सर्व नातेवाईक तडवळ येथील रेल्वे स्थानकात उतरले. आणि बाळ आणि बाळंतीणीला घेऊन सोलापूर गाठले.
सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एक दिवसाची कन्या (बाळ) उपचारापूर्वी मयत झाली. बाळंतिणीची प्रकृती सुखरूप असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून प्राथमिक तपास हवालदार चमके करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ म्हैसगाव येथे दुचाकीच्या धडकेने वृद्ध पादचारी महिलेचा मृत्यू
सोलापूर – रस्त्यावरून पायी जाताना पाठीमागून दुचाकी धडकल्याने ८५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मयत झाल्या. हा अपघात म्हैसगाव (ता.माढा) येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला.
दगडूबाई नागनाथ मदने (वय ८५ रा. म्हैसगाव) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी त्या कुर्डूवाडी ते बार्शी रोड वरून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीच्या धडकेने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना कुर्डूवाडी येथे प्राथमिक उपचार करून धनाजी मदने (मुलगा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्या उपचारापूर्वी मयात झाल्या. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादावरुन तरुणाने गळफास घेवून केली आत्महत्या
मंगळवेढा : पती – पत्नीमध्ये किरकोळ स्वरुपाचा वाद झाल्याने रागाच्या भरात एका ऊसतोड कामगाराने आंब्याच्या झाडाला गळफास घेवून माचणूर येथे आत्महत्या केली. विठ्ठल किसन माने (वय 26 रा.जनेवाडी ता.पाटोदा जि.बीड) असे गळफास घेणार्या तरुणाचे नाव असून अकस्मात अशी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील खबर देणारे राजू अर्जुन सुरवसे (मुळ रा.जुनेवाडी जि.बीड) हे ऊसतोडीचे काम करीत आहेत. माचणूर परिसरातील ब्रम्हपुरी – मुंढेवाडी रस्त्यालगत ऊसतोडणी मजूर कोप्या घालून रहावयास आहेत. यातील मयत हे खबर देणार्याचा भाचा असून मयत व त्यांची पत्नी यांच्यामध्ये घरातील किरकोळ वाद झाला होता.
रागाच्या भरात मयत विठ्ठल माने याने शुक्रवारी ( दि.13) सकाळी 7 पुर्वी शेतामधील बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार नवले हे करीत आहेत.