□ यंदाही पाऊसमान चांगला पण नैसर्गिक संकटाचे संकेत
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रविवारी रात्री होमविधी पार पडल्यानंतर भगिनी समाजजवळ मानकरी देशमुख यांच्या घरातून आणलेल्या वासराची रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी भाकणूक झाली. Veal prediction in Shri Siddheshwar Yatra, Aaj Sobeshe Darukam, Laser Show Solapur यावेळी वासराने मलमूत्र विसर्जन केले. त्यावरून यंदाही पाऊस चांगला होणार असल्याचे भाकीत नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले.
वासरासमोर गूळ, गाजर, ऊस, तांदूळ, गहू यासह अन्य विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र यापैकी कोणत्याही वस्तूला वासराने स्पर्श केला नाही. त्यामुळे शेतमालाचे दर स्थिर राहणार आणि पूजेच्यावेळी वासरू बिथरले होते. त्यावरुन देशात नैसर्गिक संकट येऊ शकते, असा अंदाज यावेळी मानकऱ्यांनी व्यक्त केला.
भाकणूक ऐकण्यासाठी सिध्देश्वरभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. वासराने मलमूत्र विसर्जन करताच उपस्थितांनी श्री सिध्देश्वरांचा जयघोष केला. येणाऱ्या हंगामात चांगला पाऊस होणार असल्याने भक्तांनी आनंद व्यक्त केला. गेली दोन वर्षे खरीप आणि रब्बी हंगामात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. यंदाही चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी काल रविवारी रात्री ११.३० वाजता मानाच्या सातही नंदीध्वजांच्या साक्षीने येथील होम मैदानावरील होमकुंडात होमविधीचा धार्मिक सोहळा मंगलमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत, अत्यंत भक्तिभावाने पार पडला. यावेळी सिध्देश्वर भक्तांनी ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री सिध्देश्वर महाराज की जय हर्रऽऽ’ असा जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकला. होमविधीसाठी आलेल्या भाविकांमुळे होम मैदान फुलून गेले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते मानाच्या नंदीध्वजांची पूजा झाली. त्यानंतर होम मैदानावर होणाऱ्या होम विधीसाठी मानाच्या सातही नंदीध्वजांच्या सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी नंदीध्वज व पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी व फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या.
श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने आज सोमवारी रात्री आठ वाजता होम मैदानावर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त शोभेच्या दारूकामाची आतषबाजी आणि लेझर शो चे आयोजन केले आहे.
पन्नास बाय चाळीस फूट अशा भव्य पडद्यावर लेझर शो दाखवण्यात येणार असून, या लेझर शोमध्ये बालयोगी श्रीसिध्दरामेश्वरांचा जन्म, श्री मल्लव्यांनी श्री सिध्दरामेश्वरांच्या हातून हुरडा खातानाचा प्रसंग, श्रीशैल पर्वतावरील श्री मल्लिकार्जुन यांच्याकडून श्री सिध्दरामेश्वरांनी घेतलेली दीक्षा, श्री मल्लिकार्जुन व श्री सिध्दरामेश्वर यांच्या झालेला दैवी संवाद व श्री सिध्दरामेश्वरांनी सोन्नलगीमध्ये म्हणजे आजच्या सोलापूरमध्ये केलेले कार्य अशा अनेक गोष्टींवर लेझर शोमधून माहिती दिली जाणार आहे.
या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे.