■ आमदार समाधान आवताडे यांचा मास्टर स्ट्रोक
पंढरपूर /सूरज सरवदे : मंगळवेढ्यात परिचारक भालके यांची समविचारी आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच पंढरपुरात मात्र भालके गटाला मोठा धक्का बसला आहे. भालके समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. कासेगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. Another blow to the Bhalke group; Taluka President of NCP on BJP’s way Pandharpur Mangalvedha Saadhan Awatade masterstroke
एकीकडे परिचारक आणि भालके यांची युती होत असतानाच आमदार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांना आपल्या गळाला लावून मास्टर स्ट्रोक दिला आहे. कासेगाव येथे आमदार समाधान आवताडे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विजयसिंह देशमुख म्हणाले की, आम्ही भारत नाना भालके यांची कार्यकर्ते. त्यांच्यासोबत अनेक वर्ष आम्ही काम केलं मात्र भारतनाना भालके यांच्या निधनानंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. आपल्याला नेतृत्व पूर्वी जे होतं ते आता राहिले नाही. त्यामुळे आता समाधानदादा अवताडे यांच्या पाठीमागे आता आपण सर्वांनी जाण्याची घोषणा त्यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
श्री संत दामाजी साखर कारखान्यावरून परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. मंगळवेढ्यात परिचारक – भालके समविचारी आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे मंगळवेढा येथील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार आहेत. मात्र पंढरपूरमध्ये परिचारकांना विरोध करणारे भालके यांचे कार्यकर्ते आता आमदार समाधान आवताडे यांच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे.
यापूर्वी भालके गटाचे कट्टर समर्थक संजय बंदपट्टे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश केला आहे. भालके परिचारक यांच्या युतीला पंढरपुरातून विरोध होताना दिसत आहे. आमदार आवताडे यांनी विजयसिंह देशमुख यांना गळाला लावल्यानंतर परिचारक गटातील कोणता नेता आमदार आवताडे यांच्या गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
□ भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक
भारतीय जनता पार्टी तळागाळात जाऊन काम करत आहे. ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने माझे काम सुरू आहे. कासेगावसारख्या गावामध्ये जवळपास दहा कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. तसेच या भागात एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात स्तरावर माझे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच एमआयडीसी आपण सुरू करत आहोत. भाजपच्या कामावर विश्वास ठेवून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.
– आमदार समाधान आवताडे,
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा