□ शेकडो नवरदेवांच्या स्वप्नांचा चुराडा
□ चिडलेल्या तरूणांनी बार्शीत केला राडा
बार्शी : ‘नोकरी नाही म्हणून छोकरी भेटत नाही’, अशी सध्याच्या पंचवीसी व तिसीतील तरूणांची अवस्था. दैवीकृपेने लग्न जमलेच तर आडवे मांजर जात असते किंवा विवाह ठरवायचा झाल्यास नशीब साथ देत नाही. या चिंतेने लग्नाळू तरूण वैतागले आहेत. पालकही हैराण झाले आहेत. अशा बिकट स्थितीत सोलापूरसह परिसरातील शेकडो तरूणांची फसवूणक झाली आहे. By luring her husband, a woman cheated the bridegroom in Solapur, breaking the dream of lakhs, Barshi police.
नवरी देण्याचे आमिष दाखवून बार्शीतील एका महिलेने नवरदेवांच्या नातेवाईकांकडून लाखो रूपये उकळले पण लग्न जुळवण्यासाठी आल्यानंतर नवरीच आल्या नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतापलेल्या तरूणांनी भर मंगल कार्यालयातच राडा केला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. त्या महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. आपल्याला आता सहचरणी भेटेल या अपेक्षेने आलेल्या नवरदेवांच्या स्वप्नाचा चुराडा झाला.
विवाहोइच्छुक युवकांना नवरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना विवाहासाठी नवरी न देता लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या अनेकांपैकी तिघांवर बार्शी तालुका पोलीसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने वधू-वर सूचक मंडळांमध्ये खळबळ माजली आहे. फसलेला युवक दीपक गणपत खांडे (रा. अंबड, जि. माढा) याने याप्रकरणी फिर्याद दिली. अंजली श्रीमंत धावणे (रा. सुभाषनगर ता. बार्शी), कैलास विठ्ठल नायकंदे (रा. पाटसांगवी ता. भूम जि.उस्मानाबाद), रामा खैरे (रा. पाचपिंपळा, ता. परांडा जि.उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
सध्या मुलांच्या तुलनेत उपवर मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक युवकांना विवाहासाठी नवरी मिळणे अवघड झाले आहे. याचा कांहीजण गैरफायदा घेताना दिसत आहेत. अशा विवाहोच्छुक युवकांना रक्कम किंवा त्यांच्या नातेवाईकांना फसविण्याच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार बार्शीतही पडला. यातील संशयित अंजली धावणे यांनी सुशिक्षित महिला मराठा वधू- वर परिचय मेळावा अशा गोंडस नावाखाली विवाहोच्छुक अनेक युवकांचे परिचय पत्र घेतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुमारे ३०० च्यावर युवकांची त्यांच्याकडे परिचय पत्रे असल्याची माहिती समोर येत आहे. आश्रमातील मुली विवाहासाठी आपल्याला दाखवू असे सांगून एजंटाकरवी जमेल तसे 3 हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंत उकळली. सुरुवातीला भूम आदी ठिकाणी मेळावे घेवून मुलगी दाखविण्यासाठी काहींना विवाहासाठी पुढच्या तारखा दिल्या तर कांहीना लग्नाच्या तयारीनिशी येण्याचे सांगितले होते. बार्शीत शनिवार दि. २८ रोजी तिसरा मेळावा घेण्यात आला. यावेळी आज आपले लग्न होणार या आशेने कांहीजण मामाबरोबर नवरीसाठी दागदागिने, कपडेलत्ते अशा तयारीनिशी आले होते. तिथे आल्यानंतर मुलगी दाखवू व लगेच लग्न असे काहींना सांगितले होते.
त्यामुळे बार्शी बाहयवळण रस्त्यावर असलेल्या किलचे यांच्या मंगलकार्यालयात विवाहोच्छुक युवक व त्यांच्या नातेवाईकांची तोबा गर्दी झाली होती. मेळावा सुरू झाल्यानंतर तिथे वधू म्हणून एकही मुलगी आलेली नव्हती. त्या मेळाव्यातही पुढील महिन्यातील तारीख दिल्यानंतर कांही पालकांचा व युवकांचा संयम सुटला. काहींनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. पोलिसांनी अंजली धावणे व त्यांच्या कांही एजंटांची चौकशी केली. त्यांच्याकडे अनेक मुलांचे परिचय पत्र होते. परंतु एकाही मुलीचे परिचय पत्र त्यांच्याकडे नव्हते व वधू-वरांचा परिचय मेळावा असताना एकही वधू तिथे उपस्थित नव्हती.
अनेकांनी त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे सांगितले. तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आल्यानंतर धावणे व त्यांच्या सोबतच्या ७-८ महिला एजंटांना ताब्यात घेतले. तक्रारदारांची यादी केल्यानंतर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
● अवघ्या तिघांवरच गुन्हा कसा ?
फसवणूक झालेल्या युवकांमध्ये बार्शीसह, सोलापूर, उस्मानाबादसह इतर जिल्ह्यातील युवकांचा समावेश आहे. दुपारी ३ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर रात्री १० पर्यंत गुन्हा दाखल करण्याचेच काम सुरू होते. धावणे यांच्यासोबत या फसवणुकीत अनेकजण सामील असताना फक्त तिघांवरच गुन्हा कसा दाखल झाला ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात शेकडो जणांची फसवणूक होवून फसवणुकीची रक्कमही कांही लाखांत आहे. त्यामुळे लोकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेवून आपली पोळी भाजणाऱ्या अशा प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी वरिष्ठांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. तरच अशा प्रवृत्तींना आळा बसणार आहे.
● सामाजिक बदनामीची भीती…
सामाजिक बदनामीची भीती तसेच नाते संबंधाच्या नामुष्कीमुळे अनेक तरूणांचे पालक तक्रार करण्यास पुढे आले नाहीत. जर तसे धाडस त्यांनी दाखवले असते तर केस स्टॅन्ड झाली असती परंतु पालकांनी पाऊल मागे घेतल्याने त्या तिघांना गेट जामीन मिळाला. आता घेतलेले पैसे परत देण्याचा प्रकार सुरू असून उकळलेल्या पैशांपेक्षा कमी रक्कम पालकांच्या हातावर टिकवली जात आहे, अशी बार्शी शहरात चर्चा होत आहे.