● तपासासाठी नेमले सहा पथक
सोलापूर : चोरटे कधी कुठल्या वस्तूवर डल्ला मारतील सांगता येत नाही. घरात भरपूर नोटा असल्याचे हेरून चोरीची घटना सोलापुरातील दक्षिण कसबा येथील शनी मंदिराजवळ राहणारे एका व्यापा-याच्या घरात घडली आहे. Solapur | 45 lakh notes were stolen after breaking into a trading house
व्यापारी आशिष पद्माकर पाटोदेकर (वय-३०, रा. दक्षिण कसबा, शनी मंदिर जवळ, सोलापूर) हे जिनिग व डाल मिल व्यापारी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त पुणे येथे गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करत घरफोडी केली.
चोरट्याने हॉलमधील टीव्ही टेबलच्या टॉवरमध्ये ठेवलेली चावी घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरूम मधील कपाटाचे लॉक काढले.
लाल रंगाच्या ट्रॅव्हलिंग बॅग मधील ५०० रुपये दराच्या १५ लाखाच्या नोटा,तसेच पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यामध्ये ठेवलेल्या ५००,२०० आणि १०० रूपये दराच्या १५ लाखाच्या नोटा, तसेच पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक मध्ये ठेवलेल्या ५००, २०० आणि १०० रुपये दराच्या १५ लाखाच्या नोटा अशा जवळपास ४५ लाखाच्या नोटा चोरुन नेल्या. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
● तपासासाठी सहा पथक नेमले
ही चोरी कशी झाली व कोणी केली ? बनावट चावी चा उपयोग कसा करण्यात आला ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या गुलदस्तात आहेत. या घटनेचा शोध घेण्यासाठी सहा पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. घरातील कुणाकडे चाव्यांची जबाबदारी असते, त्यांना बोलवून घेऊन चौकशी केली असल्याचे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी ‘सुराज्य’ शी बोलताना सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ड्रायव्हरची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – होटगी रोडवरील आनंद नगर (भाग १) येथे राहणाऱ्या संतोष उद्धव माने (वय ५२) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज बुधवारी (ता.1 फेब्रुवारी ) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
संतोष माने याचा मृतदेह आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घरातील किचन रूम मधील छताच्या लोखंडी अँगलला बेडशिट च्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत संतोष हा खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार फुलारी पुढील तपास करीत आहेत.
● आग्या मोहोळच्या दंशाने वृद्ध महिला आणी ४ मुले जखमी
सोलापूर – दुचाकीवरून जात असताना अचानक आग्या मोहोळच्या मधमाशांनी दंश केल्याने ८५ वर्षीय वृद्ध महिला आणि ४ लहान मुले जखमी झाले. ही घटना डिकसळ (ता.मोहोळ) येथे आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
द्रोपदी दिगंबर ढवण (वय ८५), तानवी संजय ढवण (वय ४ वर्षे) तिचा भाऊ आतिश ढवण (वय अडीच वर्षे, (सर्व रा. बिटले ता.मोहोळ), मोहिनी नवनाथ शेंडगे( वय ३ वर्षे) आणि आदर्श यशवंत वाघमारे (वय ४ वर्षे दोघे रा.डिकसळ) अशी जखमीची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्वजण नवनाथ शेंडगे (रा.डिकसळ) यांच्या दुचाकीवर बसून डिकसळ ते बिटले या गावाकडे निघाले होते. डिकसळ येथील मसले चौधरी रोडवर अचानक मधमाशांनी त्यांच्यावर धावा केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.