● आता डंख करायची वेळ आली आहे
मुंबई : ‘तुम्ही ज्यापद्धतीने धनुष्यबाण चोरला आहे ना… त्या चोरांना माझे आव्हान आहे. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या…. मी मशाल घेऊन येतो. होऊ द्या निवडणूक. शिवसैनिकांनो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा. मी पुर्वी प्रमाणेच तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढत आहे आणि लढत राहील. मी खचलो नाही, तुम्ही खचू नका असे आवाहन ठाकरेंनी शिवसैनिकांना केले. चोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथही यावेळी त्यांनी घेतली.
धनुष्यबाण आणि शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतल्या मातोश्रीबाहेरील कलानगर चौकात ओपन जीपमधून भाषण केले. यावेळी त्यांनी आपण आता रस्त्यावर उतरणार, असे जाहीर केले. ठाकरे यांच्या ओपन जीपमधील भाषणाने बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवरील टपावर केलेल्या भाषणाचे फोटो पुन्हा समोर आले आहेत. बाळासाहेबांनीही शिवसैनिकांना एकदा संबोधित करताना गाडीच्या टपावरून भाषण केले होते.
आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे.
उद्धव ठाकरेंनी हे रणशिंग फुंगतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शैली वापरली आहे. १९६८ साली बाळासाहेबांना दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.
धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील.. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते असं थेट आव्हान देत धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो असे ठाकरे म्हणाले. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो उताणा पडला. या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 उद्धव ठाकरेंना त्यांचीच एक चूक भोवली, त्यामुळेच शिवसेना पक्षासह चिन्हही गेले
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाईत उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या हातून आता शिवसेना पक्ष गेला आहे. धनुष्यबाणही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. पण उद्धव ठाकरेंना त्यांचीच एक चूक भोवल्याचा म्हटले जात आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयावर ठाकरे गटाने टीका केली असली तरी उध्दव ठाकरेंची एक चूक शिवसेनेला महाग पडली आहे. 2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला उध्दव ठाकरेंनी कळवला नाही आणि हीच चूक ठाकरे गटाला महाग पडली आहे. पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. पक्षांतर्गत निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी आयोगाचा विश्वास गमावल्याचे समोर आले आहे..
बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 यांनी पक्ष घटनेतील काही बदल हे लोकशाही मूल्याशी सुसंगत नव्हते. त्यावेळी निवडणूक आयोगाने हे बदल नाकारले होते. निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर पक्ष घटना ही अधिक सुसंगत करण्यात आली. लोकशाही विरोधी असलेले बदल पुन्हा गुप्तपणे पक्ष घटनेत करण्यात आले. त्यामुळे पक्ष हा एका कुटुंबाची मालमत्ता झाली असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. तसेच शिवसेना पक्ष म्हणून शिंदेंच्याच गटाला मान्यता दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हा सत्याचा विजय आहे, हा बाळासाहेंबाच्या विचारांचा विजय आहे, लोकशाहीचा हा विजय असून बहुमताचा विजय झाला आहे, असे म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे आभार मानत यापुढे बाळासाहेबांच्या विचाराने राज्यकारभार करु असे शिंदेंनी म्हटले.
2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत.
शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.