□ स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांची घोषणा
अकलूज : सलग २६ वर्षे गाजलेली अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा गेल्या चार वर्षांपासून बंद करण्यात आली होती. ती आता पुढील वर्षापासून नव्याने सुरू करणार असल्याची घोषणा प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी केली. Mohite-Patil, Akluj’s state-level planting competition will resume due to the insistence of lovers and planting artists. त्याशिवाय जयसिंह व मदनसिंह या मोहिते पाटील बंधूंच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या वाटचालीनिमित्त एक डिसेंबरपासून २०२३ सध्याच्या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेला व्यापक स्वरूप देऊन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील,मदनसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील आदी उपस्थित होते. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळच्या वतीने १४ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान ही राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा होईल.
अडीच लाख रुपयांचे पहिले पारितोषिक असेल. द्वितीय दोन लाख,तृतीय दीड लाख आणि चौथे बक्षीस एक लाख रुपयांचे असेल. सर्व सहभागी लावणी पार्ट्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे, अशी घोषणा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी केली. १ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी पहिले बक्षीस अडीच लाख, दुसरे दोन लाख, तिसरे दीड लाख आणि चौथे बक्षीस एक लाख, पाचवे बक्षीस ५० हजार आणि सहावे बक्षीस २५ हजार रुपयांचे असेल.
अकलूज येथील लावणी स्पर्धा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १९९३ ते त्यांचे जन्मशताब्दी वर्ष २०१८ पर्यंत सलग २६ वर्षे चालली. एवढा प्रदीर्घ काळ आणि यशस्वीपणे चालणारी ही राज्यातील नावाजलेली लावणी स्पर्धा आहे. गेल्या चार वर्षांपासून ही स्पर्धा बंद होती. राज्यातील लावणी रसिक आणि लावणी कलावंतांच्या आग्रहाखातर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या लावणी स्पर्धेने चंदेरी दुनियेला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत.
》अखेर शेवटचा अर्ज माघार, कुर्डूवाडी जनता सहकारी बॅंक बिनविरोध
कुर्डुवाडी : कुर्डूवाडी जनता सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जनता सहकारी पॅनलच्या सर्वसाधारण १० उमेदवाराविरुद्ध उद्योजक संतोष शेंडे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे जनता सहकारी पॅनलच्या सर्व १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
या बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागेसाठी एकूण ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्तारूढ जनता – सहकार पॅनलच्या महिला राखीव गटातील उमेदवार डॉ. मोनिका आशिष शहा, सुलभा दिंडे (दास) यापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्या, तर भटक्या जाती जमाती गटातून बँकचे विद्यमान उपाध्यक्ष अनिल तरटे व इतर मागास प्रवर्गातून डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर हे सहकार पॅनलचे दोन उमेदवारही बिनविरोध. सहकार पॅनल मधील अनुसुचित जाती जमाती या प्रवर्गातून बँकचे माजी अध्यक्ष अशोक खाडे यांच्या विरोधात सत्तारूढ गटाला आव्हान देणारे बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष जगन्नाथ क्षीरसागर यांचे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून आणि सर्वसाधारण गटातून दाखल केलेले दोन्ही उमेदवारी अर्ज छाननी मध्ये नामंजूर झाले होते.
त्यामुळे अशोक खाडे देखील अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून बिनविरोध झाले होते. तरी या निर्णयाविरोधात जगन्नाथ क्षीरसागर यांनी सहकार आयुक्तांकडे अपिलात जाऊन या निर्णयाला आव्हान दिले होते. परंतू अपिलाच्या सुनावणीपूर्वीच त्यांनी केलेले अपील मागे घेतल्यामुळे अशोक खाडे हे बिनविरोधच ठरले.
मात्र सर्वसाधारण गटातील १० जागांसाठी जनता सहकार पॅनलच्या दहा उमेदवारांविरोधात एकमेव संतोष शेंडे यांचा अर्ज राहिला होता. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मात्र आज सोमवार (दि.२०) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संतोष शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सर्वसाधारण गटातील फुलचंद धोका, अरुण गिड्डे, सुरेश शहा, विक्रम बोराडे, दिलीप धोका, अर्जुनराव बागल, किरण दोशी, दिलीप तळेकर, अनिल पाटील, विजयसिंह कृष्णराव परबत दहा उमेदवार ही बिनविरोध झाले. बिनविरोध निवडणूकीमुळे बँकेचा निवडणूकीकरीता होणारा खर्च मात्र वाचला आहे.
आमदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा उमेदवार अर्ज भरला होता. व शिंदेंच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतला आहे. बॅंकेच्या संचालकांनी घरी बसुन भत्ते घेऊ नये. यापुढे पारदर्शक कारभार करावा, अशी मागणी संतोष शेंडे यांनी केली.