● भाजप- शिंदे गटाची मांड पक्की, ठाकरेंच्या मावळ्यांची विवंचना, राष्ट्रवादीपुढे नवी डोकेदुखी
• विशेष प्रतिनिधी : राज्याची शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्याने त्यांना मोठे स्वतंत्र बळ प्राप्त झाले आहे. या नव्या ताकतीतून शिंदे गट आणि भाजप यांची राजकीय मांड अजून मजबूत झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पार बदलणार आहेत. Politics of Solapur at ‘turning point’, political equations will change across Shinde group Thackeray nationalist headache
आयोगाच्या या निर्णयाने महाविकास आघाडीतील विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे तर हातून धनुष्यबाणच निसटल्याने आता कुणाच्या आश्रयाला जायचे ? ही उद्धव ठाकरे यांच्या मावळ्यांची विवंचना आहे. शिंदे गट आपल्याला थारा देईल का? ही एक काळजी ठाकरे समर्थकांना सतावत आहे. सत्ता म्हणजे ‘पाणी बिना मच्छली’, अशी अवस्था राजकीय नेत्यांची व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची असते. त्यामुळे ठाकरे गटासह आघाडीतील काही नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या ‘वानरउड्या’ कशा असतील, हे पहायला सारा जिल्हा उत्सुक झाला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात शिवसेनेची प्रचंड ताकत आहे. एकेकाळी जिल्ह्यात सेनेच्या चार- पाच आमदारांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केल्याचे सोलापूरकरांच्या चांगलेच स्मरणात आहे. सोलापूर महापालिकेत ११ नगरसेवकांचे चेहरे होते. झेडपी आणि इतर लोकल बॉडीमध्ये सेनेचा चंचुप्रवेश कायम असायचा. सांगोल्याचे शहाजीबापू हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर सेनेचा ‘श्वास’ अजून आहे, असे म्हणायला जागा असतानाच त्यांनीही ऐनवेळी ‘मातोश्री’कडे पाठ फिरवली.
नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर सेनेतला एक मोठा लोंढा शिंदे गटाकडे झुकला. त्यामुळे सेनेचा किल्ला खिळखिळा झाला. अशा स्थितीतही इथल्या मावळ्यांनी उध्दव यांना धीर दिला व अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षच हातून गेल्याने ठाकरे यांचे मावळे आता कोणती भूमिका घेणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या कृपेने सोलापूरसह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती मोठी आहे. उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा झेंडा हाती घेतल्यानंतर राष्ट्रवादीची ताकत आणखीन भक्कम झाली होती. परंतु ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदाचे व पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याने राष्ट्रवादीपुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ सत्तेची ‘दोरी’.. …
: राज्याच्या सत्तेची दोरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. ठाकरे गटाची नशा कशी उतरवली? याचा आनंद त्यांच्या मनात आहे पण आता या सत्तेची दोरी ते प्रबळपणे हालवायला लागतील. लोकल, बॉडीसह डीसीसी बँक व काही साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे फडणवीस हे सत्तेची दोरी जिल्ह्याच्या राजकारणात कशाप्रकारे हालवतील आणि कुणा कुणाला गळाला लावतील? त्याची मजा येत्या काळात पहायला मिळेल, असे वाटते.
● महापालिका आणि ‘झेडपी’त काय होणार ?
सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायती यांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केव्हाही लागतील. त्यादृष्टीने महाविकास आघाडी, भाजप- शिंदे गट यांच्या रणनीती आखली जात आहे. त्या अनुषंगाने हायकमांडचे दौरेही सोलापूरसह जिल्हाभर सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा विश्वास प्रचंड वाढला आहे.
विरोधक एकत्र झाले तर भाजपचा पालापाचोळा होवून जातो, असा प्रचार आघाडीच्या नेत्यांकडून केला केला जात असतानाच उद्धव यांच्या हातून पक्षच निसटल्याने आघाडीतील एक पक्ष गळून पडला. पहिल्यापासून आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसला अधिक महत्व देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव यांनाच जास्त गोंजारले जात होते. कारण काँग्रेसपेक्षा सेनेची ताकत अधिक आहे. आता राष्ट्रवादीला लोकल बॉडी आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी नवी रणनीती आखावी लागेल. कारण भाजप व शिंदे गट यांचे तगडे आव्हान समोर असणार आहे.
● सोपलांच्या भूमिकेकडे लक्ष…
बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ठेंगा दाखवत २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यावरून बार्शीत सेनेची ताकत पहायला मिळाली. ते अजूनही सेनेत आहेत. त्यांच्या रूपाने एक बलवान नेता उद्धव यांच्याकडे आहे. बार्शीसह तालुक्यात त्यांचे वजन आहे. शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने सोपल यांची पुढची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तेव्हा त्यांनी यावर अजून तरी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याकरिता त्यांनाही नवी भूमिका घ्यावी लागेल, असे दिसते.