सोलापूर : गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते डॉ. प्रमोद सावंत हे उद्या बुधवारी (ता. २२) सोलापूर दौ-यावर आहेत. Goa Chief Minister Pramod Sawant visiting Solapur; Discussion on Rajan Patal’s palace जरी सोलापूर दौरा असला तरी या दौ-याचे मुख्य आकर्षण मोहोळ आहे. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील वाड्यावर भेटीसाठी येत असल्याची माहिती आहे. या वाड्यावर काय काय चर्चा होणार याची उत्सुकता वाढलीय.
माजी आमदार राजन पाटील यांच्या सातत्याने होत असलेल्या भाजप नेत्यांच्या भेटीमुळे लवकरच राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. त्यामुळेच तालुक्यासह जिल्ह्यात या चर्चेला या भेटीची जोड मिळाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत हे बराच वेळ राजन पाटील यांच्याकडेच थांबणार आहेत. त्यामुळे या प्रदीर्घ वेळेत काय चर्चा होणार याची उत्सुकता राजकीय जाणकारासह जिल्ह्यातील मातब्बर नेत्याना लागली आहे.
माजी आमदार पाटील यांनी १५ दिवसांपूर्वीच ‘अनगर आणि दहा गावे पाणीपुरवठा योजना’ व जुना असलेला ‘सीना-भोगावती जोड कालवा’ ही दोन कामे कोण करेल, त्याच्या सोबत मी जाणार असल्याचे सांगत त्यांनी वातावरण गरम केलंय.
दरम्यान, मागेच माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व राजन पाटील यांनी साखर कारखान्याच्या कामाचे निमित्त करून दिल्लीला जावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राजन पाटील हे सातत्याने भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे आगामी काही काळात ते भाजपचे वाट धरतील अशी चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोहोळशी जुने संबंध आहेत. ते स्वतः डॉक्टर आहेत. आमचे अनेक नातेवाईक डॉक्टर असल्याने त्यांचा व मुख्यमंत्री डॉ सावंत यांचा परिचय असल्याने ते येणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान डॉ. सावंत यांचे एक नातेवाईक मोहोळ येथे दहा ते बारा वर्षे राहत होते. उद्योजक (स्व.) बजरंग गुंड यांचे ते चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांचे मोहोळशी वेगळे नाते असल्याचे उद्योजक वैभव गुंड यांनी माध्यमांना सांगितले.
》 स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलन
सोलापूर : स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना मिळणारी रात्रीची वीज, वन्यप्राण्यांशी होणारा संघर्ष, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, अशा विविध प्रश्नांवर हे आंदोलन होणार आहे. उद्या बारावीची परिक्षा असल्याने दुपारी 12 वाजेनंतर हे आंदोलन होणार आहे. पोलीसांनी आंदोलन न करु दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
वीज दरवाढ, थकीत शेतकऱ्यांची वीज तोडण, – पाचबरोबर रस्ते विकारासाठी होत असलेल्या भुसंपादनात शेतकऱ्यांना अल्पमोबदला देणं या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी उद्या बुधवारी ( दि. २२ फेब्रुवारी ) रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन घेण्यात येणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं हे आंदोलन होत असून लाखोच्या संख्येनं शेतकरी आंदोलनात उतरतील अशी माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत आज सोलापूरात दिली. सरकारची धोरणं ही नेहमीच शेतकरी विरोधी राहिले आहेत. सरकार बदलली तरी शेतकऱ्यांच्या प्रती प्रश्न सोडविण्यात कोणासही यश आलेलं नाही. उद्याचं आंदोलन हे दुपारी १२ वाजल्यानंतरच सुरु करावं. कारण सध्या १२ वीची परिक्षा सुरु आहे, याचा त्रास परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होवू नये याची काळजी घेवू असंही शेट्टी म्हणाले.
पोलीसांनी आंदोलन रोखू नये अन्यथा जशासतसं उत्तर देवू असा इशारा शेट्टी यांनी दिला. सोलापूरात सुरत चेन्नई जाणाऱ्या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना योग्य मोबदला मिळाला नसल्याचंही शेट्टी म्हणाले.